आचारसंहितेमुळे अर्ज विक्रीला जून, जुलै उजाडण्याची शक्यता; निवडणुकीमुळे मनुष्यबळाचाही तुटवडा

गेली अनेक महिने प्रतिक्षेत असलेल्या सिडकोच्या नव्वद हजार घरांच्या दुसऱ्या महागृहनिर्मितीला लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचा खोडा बसला आहे. १ मे रोजी या घरांसाठी अर्ज विक्रीची सुरुवात केली जाणार होती, मात्र या काळात महाराष्ट्र वगळता देशात इतर ठिकाणी मतदान होणार असल्याने या सर्व प्रक्रियेला लगाम लागला आहे. त्यात सिडकोतील अनेक कर्मचारी व अधिकारी हे निवडणूक कामासाठी बाहेर गेलेले आहेत. त्यामुळेही अर्ज विक्रीला जून, जुलै महिना उजाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिडको स्थापनेच्या पन्नास वर्षांत केवळ एक लाख ३० हजार घरे बांधणाऱ्या सिडकोने आता आर्थिकदृष्टया दुर्बळ व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचा संकल्प सोडला आहे. केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेत सिडको व म्हाडावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोने गेल्या वर्षी पंधरा हजार घरांची सोडत काढली आहे. यासाठी १ लाख ९१ हजार अर्ज आल्याने आजही सिडकोच्या घरांना मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सिडकोला आणखी गृहनिर्मिती नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी नवी मुंबईच्या दक्षिण भागात ५३ हजार घरांचा यापूर्वीच आराखडा तयार केलेला आहे. ती घरे गृहीत धरुन विद्यमान व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आणखी ३७ हजार घरांचे खारघर, तळोजा, आणि द्रोणागिरी या भागात नियोजन केले आहे. एकीकडे बांधकामाला सुरुवात तर दुसरीकडे विक्री अशी खासगी विकासकांच्या धर्तीवर विक्रीची संकल्पना चंद्र यांनी मांडली आहे.

१५ हजार घरांची यशस्वी सोडत झाल्यानंतर सिडकोने या घरांच्या नियोजनाला सुरुवात केली असून तसा आराखडा तयार करण्यात आला आहे. मागील घरांची अर्जविक्री ही १५ ऑगस्टला सुरु करण्यात आली तर सोडत २ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली होती. यातील ११०० शिल्लक घरे ही १४ फेब्रुवारीला देण्यात आली.  या ९० हजार घरांच्या अर्जविक्रीसाठी १ मे हा दिवस निश्चित केला होता. त्याला आचारसंहितेमुळे खोडा बसला आहे. आता ही अर्ज विक्री जून व जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. एकूण ९० हजार घरांपैकी ५३ हजार घरे ही आर्थिकदृष्टया दुर्बळ घटकांसाठी असून शिल्लक ३७ हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी राखीव आहेत.

गेल्या वर्षी पंधरा हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर यंदा जाहीर करण्यात आलेल्या ९० हजार घरांच्या अर्ज विक्रीसाठी पणन विभाग तयार आहे. १५ हजार घरांसाठी वापरण्या आलेली संगणक प्रणाली या घरांसाठीही वापरण्यात येणार असल्याने सिस्टिम तयार आहे पण अर्ज विक्री विक्री बाबत प्रशासनाचे कोणतेही आदेश नाहीत.    लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको

खाली वाहनतळ; वर निवासीसंकूल

सिडकोकडे आता जमिनीचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे महामुंबई क्षेत्रातील रेल्वे स्थानकाबाहेर सिडकोने दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी विस्र्तीण अशी मोकळी जमिन सोडलेली आहे. या जमिनीचा सिडको आता वापर करणार असून पहिल्यांदा दक्षिण नवी मुंबईतील खारघर, खांदेश्वर, उलवा, खारकोपर या रेल्वे स्थानकांच्या बाहेर आर्थिकदृष्टया दुर्बळ घटकांसाठी १५ हजार घरे बांधली जाणार आहेत. खाली वाहनतळ आणि वर निवास अशी ही योजना राज्यात पहिल्यांदाच अंमलात आणली जात आहे.