* खार कोपपर्यंत नेरुळ-उरण रेल्वे जुलैमध्ये * विमानतळाच्या कामाला चालना * १३ हजार घरांची निर्मिती

नवीन वर्षांत सिडकोचे अनेक प्रकल्प मार्गी लागणार असून, त्यात जुलैमध्ये नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील खार कोपर गावापर्यंत रेल्वे सेवा सुरू होणार आहे. याच वर्षांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू होणार असून खारघरमध्ये सिडको १३ हजार ८०० घरांच्या निर्मितीला प्रारंभ होणार आहे. याशिवाय नव्याने स्थापन झालेल्या पनवले महापालिकेला विक्रीयोग्य भूखंड वगळता खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली भागांतील शहरीभाग हस्तांतरित केला जाणार आहे.

भारतीय रेल्वेबरोबर सामंजस्य करार करून सिडकोने मानखुर्द-वाशी, ठाणे-तुर्भे असे दोन रेल्वे मार्ग यापूर्वी सुरू केले आहेत. यात सिडकोने खर्चाचा ६७ टक्के भाग उचलून २०० किलोमीटर मार्ग तयार केले आहेत. जेएनपीटी बंदरामुळे औद्योगिक विस्तार झालेल्या उरण भागात रेल्वेचे जाळे विणताना सिडकोने नेरुळ-उरण हा १७०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प चार वर्षांपूर्वी सुरू केला. या मार्गातील खार कोपर रेल्वेस्थानकापर्यंत पहिल्या टप्प्यातील रेल्वेसेवा सुरू करण्याचा सिडकोचा प्रयत्न असून ती जुलैपर्यंत धावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १२ किलोमीटरच्या या मार्गावर पाच रेल्वे स्थानके असून उलवा या सिडकोनिर्मित नोडला रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे. आजच्या घडीला या नोडकडे जाण्यासाठी दळणवळणाची योग्य ती साधने नसल्याने अनेक रहिवाशांनी उन्नती गृहसंकुलात विकत घेतलेली घरे रिकामी ठेवली आहेत. ही रेल्वे सेवा या क्षेत्रातील रहिवाशांना वरदान ठरणार आहे. नेरुळ उरण रेल्वेमार्गावरील पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर जमीन संपादनामुळे रखडलेला दुसरा टप्पा त्यानंतर पुढील दोन वर्षांत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे रेल्वे सेवेचे शहरातील एक वर्तुळ पूर्ण होणार आहे.

नवी मुंबई विमानतळाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याची सिडकोला खात्री आहे. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी चार दिवसांपूर्वी हा प्रकल्प सुरू होण्यास आणखी आठ वर्षे लागतील, असे मत मांडले होते. मात्र या प्रकल्पाचे काम नवीन वर्षांत सुरू होईलस, अशी खात्री सिडकोला आहे. त्यासाठी प्रकल्पपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. पुढील महिन्यात जागतिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. या निविदांना आणखी एक महिना मुदतवाढ दिली गेली तरी जुलैपर्यंत या कामाची निविदा खुली केली जाण्याची सिडकोला खात्री आहे.

निविदाकारांच्या मागणीनुसार निश्चलनीकरणामुळे जास्तीतजास्त एक महिना मुदतवाढ दिली जाऊ शकते, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. निविदा दिल्यानंतर याच वर्षी प्रत्यक्ष गाभा क्षेत्रातील कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या विमानतळाच्या धावपट्टीवरू उड्डाण कधी होईल, याची खात्री नसली, तरी यंदा या कामाला सुरुवात होईल, याची खात्री सिडकोत व्यक्त केली जात आहे.

अल्प, अत्यल्प गटासाठी घरे

सिडकोच्या तळोजा खारघर क्षेत्रात अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी १३ हजार ८०० घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यांची सोडत देखील याच वर्षी निघणार आहे. त्याशिवाय सिडको पनवेल महापालिकेला खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी, पनवेल, आणि कामोठे या सिडकोनिर्मित क्षेत्रांतील विक्रीयोग्य भूखंड वगळता अन्य भूखंड हस्तांतरित करणार आहे. नवी मुंबई पालिकेला नोड हस्तांतरित करण्यास सिडकोने २० वर्षांचा कालावधी घेतला, पण पनवेल महापालिकेत हे नोड जून-जुलैपर्यंत हस्तांतरित केले जाणार आहेत. त्याचा मसुदा सध्या तयार केला जात आहे. सिडकोने खारघर येथे बांधलेले ग्रामविकास भवनदेखील शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे.