विकास महाडिक, नवी मुंबई

सिडकोने खासगी विकासकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी अल्प व आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ नागरिकांसाठी स्वतंत्र अशा वसाहती (टाऊनशिप) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी त्यासाठी जमिनींचा शोध घेण्याचे आदेश नियोजन विभागाला दिले आहेत.

अल्प व आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकांसाठी बांधण्यात येणारी ही घरे उपलब्ध जमिनीनुसार असल्याने विस्कळीत व संमिश्र लोकवस्तीची आहेत. त्यामुळे सिडकोने समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ, अल्प, मध्यम वर्गासाठी सर्व सुविधायुक्त अशा स्वतंत्र वसाहती कामाच्या ठिकाणांजवळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत राहून कामानिमित्ताने महामुंबईत यावे लागणाऱ्या नोकरदारांना या वसाहतींमध्ये घर घेणे सोपे जाणार आहे. मुंबईत ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ, वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून स्वस्त घरांच्या शोधात नोकरदार वर्ग असतो. सिडकोने या नोकरदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी ही योजना बाजारात आणण्याचे ठरविले आहे. तीस वर्षांपूर्वी सिडकोने अशा प्रकारच्या वसाहती तयार केल्या होत्या, त्याला चांगला प्रतिसाद लाभला. सिडकोने नव्वदच्या दशकात विकासकांना भूखंड विकण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे महामुंबईतील घरांच्या किमतींची कृत्रिम वाढ झाली आहे.

सिडकोने गेल्या वर्षी पंधरा हजार घरांची सोडत काढली. त्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारची सर्वासाठी घरे योजना पूर्णत्वास नेण्यासाठी थेट ९४ हजार घरे उभारणीची घोषणा केली आहे. त्यांचीही निविदा प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे एकाच वेळी एक लाख दहा हजार घरांचे बांधकाम सुरू होत आहे. सिडकोच्या ४९ वर्षांच्या कालावधीत केवळ एक लाख चाळीस हजार घरे बांधण्यात आली असताना केवळ दीड वर्षांत एक लाख दहा हजार घरांचे काम हाती घेण्यात आले आहे.  बांधकामास सुरुवात केलेल्या एक लाख दहा हजार घरांची अर्ज विक्री पुढील आठवडय़ात सुरू होणार आहे. त्यानंतर एक महिन्याने या घरांची सोडत निघणार आहे.

एकाच वेळी बांधकाम आणि सोडत ही संकल्पना व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची आहे. यापूर्वी सिडको घरांचे पूर्ण बांधकाम झाल्यावर घरे विकत होती. त्यामुळे ग्राहकांना एकाच वेळी कर्ज घेऊन संपूर्ण घराची किंमत भरावी लागत होती. आता ती पद्धत बंद करण्यात आल्याने ग्राहकाची दीड ते दोन लाखांची बचत होत आहे. सुलभ ४२ हप्त्यांमध्ये पूर्ण रक्कम भरणे आहे.

सिडकोचे कोटय़वधी रुपये किमतीचे भूखंड विकत घेऊन विकासक उभारणाऱ्या गृहप्रकल्पांतून पंधरा ते वीस टक्के फायदा मिळवत असेल तर त्याचा फायदा सिडको आपला नफा कमी ठेवून ग्राहकांना देण्यास तयार आहे. त्यामुळे नागरिकांना कमी किमतीत चांगल्या गुणवत्तेची, कामाच्या ठिकाणी घरे देण्यासाठी सिडको टाऊनशिपचा प्रस्ताव तयार करीत आहे.

– लोकेश चंद्र,  व्यवस्थापकीय संचालक, सिडको