सिडको खारघर ते बेलापूर खाडी किनारा मार्ग उभारणार

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या वाहतुकीला पर्याय म्हणून सिडकोच्या वतीने पारसिक डोंगराच्या कुशीत बोगदा काढण्याच्या प्रकल्पाबरोबरच खारघर ते बेलापूरदरम्यान खाडीकिनाऱ्यावर साडेपाच किलोमीटर लांबीचा सागरी किनारा मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पर्यावरण व वन विभागाच्या काही आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून या प्रकल्पावर सिडको २७२ कोटी रुपये खर्च करणार आहे. तीस महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

शीव-पनवेल महामार्गावर अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे या मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दहापदरी रुंदीकरण करूनही ही वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. त्याला सिडको व पालिकेच्या वतीने अनेक पर्याय शोधले जात आहेत. या मार्गावरून पुणे व गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने बेलापूर येथे वळणरस्त्याचे पर्याय तपासले जात आहेत.

सिडकोच्या वतीने तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक डोंगर पोखरून एक दहा किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादरीकरण दाखविण्यात आले होते. राज्य शासनाने या मार्गाला हिरवा कंदील दाखविला असून यामुळे नवी मुंबईतून वाहनचालकांचा प्रवास सुखकारक होणार आहे. याच मार्गाला दुसरा पर्याय ठरू पाहणारा खारघर ते बेलापूरदरम्यानचा एक खाडीकिनारा रस्त्याचा प्रस्ताव सिडकोने तयार केला आहे. साडेपाच किलोमीटर लांबीचा हा रस्ता खारघर सेक्टर १६ येथून सुरुवात होणार असून

बेलापूर सेक्टर ११ येथे जोडला जाणार आहे. हाच मार्ग पुढे नेरुळ येथील जलवाहतूक जेट्टीला जोडला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाचे अंतर नऊ किलोमीटर होणार आहे. या सागरी किनारा मार्गावर सिडको २७२ कोटी रुपये खर्च करणार आहे.

महिनाअखेपर्यंत निविदा

या महिनाअखेपर्यंत या मार्गाची बांधकाम निविदा काढली जाणार असून पर्यावरण व वन विभागाच्या काही शिल्लक परवानगीनंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या कामाची तीन वर्षे मुदत असून २०२२ पर्यंत हा रस्ता वाहतुकीला खुला होणार आहे. नवी मुंबई पालिकाही बेलापूरमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीला बाह्य़वळणाचा पर्याय शोधत आहे.

शीव-पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्याला विविध मार्गाचे पर्याय शोधले जात आहे. यात बेलापूर ते खारघर हा एक खाडीकिनारा मार्गाचा पर्याय असून लवकरच निविदा काढली जाणार आहे. साडेपाच किलोमीटर लांबीचा मार्ग पुढे नेरुळ जेट्टीपर्यंत जोडला जाणार आहे.

– रमेश गिरी, अधीक्षक अभियंता, सिडको.