घरे, गाळे, भूखंड मिळून एकूण २,८१३ मालमत्तांची लवकरच विक्री

नवी मुंबई गेली दोन वर्षे घर विक्रीपासून दूर गेलेल्या सिडकोने शहरातील विविध भागांत १५ हजार घरांची उभारणी सुरू केली आहे. या घरांची सोडत पुढील महिन्यात निघण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सिडकोने बांधलेल्या जुन्या नवीन दोन हजार ८१३ घरे, गाळे, भूखंड यांची विक्री केली जाणार आहे. या मालमत्तेची बाजारातील किंमत सुमारे दोन हजार कोटी रुपये आहे.

सिडकोने चाळीस वर्षांत संपूर्ण नवी मुंबईत एक लाख ३९ हजार घरे बांधली आहेत. मध्यंतरी सिडको गृहनिर्माण योजनांपासून दूर गेल्याने केवळ भूखंड विक्रीवर भर दिला जात होता. हे धोरण विकासकधार्जिणे असल्याने घरांच्या किमतींत कृत्रिम वाढ झाली होती. २०२२पर्यंत सर्वासाठी घरे या केंद्र सरकारच्या योजने अंर्तगत राज्य सरकारने गृहनिर्माण करण्याचे आदेश सिडको व म्हाडासारख्या संस्थांना दिले आहेत. यात सिडकोने ५३ हजार घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यातील १५ हजार घरे खारघर, कळंबोली, तळोजा, आणि द्रोणागिरी भागात बांधण्याचे काम सुरू झाले आहे. या घरांची सोडत काढण्याचे आदेश नवीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नुकतेच झालेल्या अधिकारी बैठकीत दिले आहेत. याशिवाय आणखी पंधरा हजार घरे बांधण्यासाठी विस्तीर्ण जमीन शोधण्याच्या सूचना नियोजन विभागाला दिल्या आहेत. यात उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी घरे असणार आहेत.

सध्या बांधकाम सुरू असलेल्या घरांत उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे नाहीत. गृह निर्मितीच्या या प्रकल्पाबरोबरच सिडकोची जुन्या नवीन घरांतील शिल्लक सर्व घरे, गाळे, दुकाने, मोकळे भूखंड, यांची तात्काळ विक्री करण्याचे आदेश चंद्र यांनी दिले आहेत. त्यामुळे सिडको प्रशासन कामाला लागले आहे.

ऐरोली ते पनवेल या दरम्यान सिडकोने १४ नोड विकसित केले असून यात काही शिल्लक घरे  अनेक वर्षे विक्रीविना पडून आहेत. यात वाशी-पनवेल व ठाणे-तुर्भे दरम्यान बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानक व वाणिज्य संकुलांचाही समावेश आहे. रेल्वेतून उतरल्यानंतर सर्व प्रकारची खरेदी करून घरी जाता येईल, अशी आखणी असलेली १२ रेल्वे स्थानके सिडकोने विकसित केली आहेत. या योजनेला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने बेलापूर व वाशी येथील रेल्वे स्थानकांवरील मालमत्ता आयटी कंपन्यांना विकल्या. तरीही या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात दुकाने व गाळे विक्रीविना पडून आहेत. या सर्व मालमत्तांची विक्री करण्याचे आदेश चंद्र यांनी दिले आहेत. यात स्वप्नपूर्ती, व्हॅलीशिल्प, सेलिब्रिशन, वास्तुशिल्प, स्पेगेटी यासारख्या नवीन संकुलांत बांधण्यात आलेल्या घरांचाही समावेश आहे.

विविध प्रकारच्या २८१३ मालमत्ता विक्रीविना असून येत्या काळात त्या विकल्या जाणार आहेत. या सर्व मालमत्ता विकल्यास सिडकोच्या तिजोरीत दोन हजार कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

यातील अनेक मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे. ते हटविण्यात येणार आहे. काही मालमत्ता आहे त्या स्थितीत विकल्या जाणार आहेत. या सर्व मालमत्तांमध्ये घरांची संख्या ७०० आहे. या घरांची पडझड आणि सद्य:स्थिती लक्षात घेता त्यांचे बाजारमूल्य निश्चित केले जाणार आहे.

विक्री न झालेल्या मालमत्ता

ऐरोली                 ८

घणसोली            ३६६

कोपरखैरणे         ८४३

वाशी                   २४

सानपाडा              ५४

नेरुळ                 १२९

बेलापूर               ५९

खारघर               ८९१

कळंबोली             ८५

न्यू पनवेल           १५१

उलवे                    १६८

खांदेश्वर               ७९

कामोठे                  २०