केंद्र सरकारने देशभरात ९८ स्मार्ट सिटी उभारण्याचा संकल्प केला असतानाच सिडकोने मात्र स्वखर्चाने स्मार्ट सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खारघर, पनवेल, कळंबोली, द्रोणागिरी, उलवे, कामोठे व प्रस्तावित पुष्पकनगर या १२ हजार २३० हेक्टर क्षेत्रफळात हे नवे शहर उभारले जाणार आहे. त्यासाठी छोटे-मोठे ८८ प्रकल्प उभारले जाणार असून, त्यावर ३४ हजार ७७७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विमानतळ, जेएनपीटी विस्तार, किफायतशीर घरे, पथदर्शी नैना प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग रुंदंीकरण, रेल्वे व मेट्रो आणि पायाभूत सुविधा असा हा ५३ हजार कोटी रुपये खर्चाचा महाप्रकल्प असून त्यातून आठ लाख ७० हजार रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मुंबई, नवी मुंबईनंतर पनवेल, उरण भागाला अनन्यसाधारण महत्त्व येत आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजना स्पर्धेत स्थान न मिळाल्याने सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रातील कमी अधिक प्रमाणात विकसित झालेले खारघर, पनवेल, कळंबोली, कामोठे, द्रोणागिरी, उलवा आणि विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी तयार करण्यात येणाऱ्या पुष्पकनगर या सात नगरांचा समावेश असलेला दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्प तयार केला आहे. विमानतळ (१६ हजार कोटी), जेएनपीटी (८ हजार कोटी), नैना (७ हजार ४०० कोटी), मेट्रो (११ हजार कोटी), किफायतशीर ५५ हजार घरे (१० हजार ७०० कोटी) या सर्व मोठय़ा प्रकल्पांमुळे सिडकोची ही दक्षिण नवी मुंबई राज्याच्या आर्थिक विकासाचे केंद्र ठरणार आहे.