प्रकल्पातील अडथळा दूर; दोन ते तीन वर्षांत काम पूर्ण होण्याची शक्यता

नवी मुंबई : नवी मुंबईत चारही दिशांना रेल्वेचे जाळे विणले जावे यासाठी गेली २८ वर्षे मध्य रेल्वेला सहकार्य करणाऱ्या सिडकोने ऐरोली-कळवा उन्नत मार्गासाठी दहा हजार चौरस फुटांची जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्नत मार्गामुळे अनेक वर्षे कल्याण, डोंबिवली, कर्जत या भागांत राहणाऱ्या नोकरदारांचे थेट नवी मुंबईत येण्याची स्वप्न पूर्ण होणार आहे. या भागातील नोकरदारांना सध्या नवी मुंबईत येण्यासाठी ठाण्याहून रेल्वे बदलण्याचा द्रविडी प्राणायाम करावा लागत आहे.

महामुंबई क्षेत्रात साठ ते सत्तर हजार नोकरदार हे कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कर्जत या भागांतून दररोज ये-जा करीत आहेत.

मुंबईतून नवी मुंबईत रेल्वे आणण्यासाठी सिडकोने ६७ टक्के आर्थिक भार उचलून जुलै १९९३ मध्ये रेल्वेला नवी मुंबईचे द्वारे खुली केली आहेत. त्यानंतर आता वाशी-पनवेल, ठाणे-तुर्भे आणि नेरुळ-उरण हे तीन मार्ग रेल्वेने जोडले गेले आहेत. ठाण्याहून नवी मुंबईत रेल्वे आणताना ठाणे ते ऐरोली असा पहिला मार्ग जोडण्यात आला आहे. त्यामुळे कर्जत मार्गावरून येणारी कोणतीही रेल्वे ही पहिल्यांदा ठाण्याला गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यावर मार्ग काढण्यासाठी ऐरोली-कळवा उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने घेतलेला आहे. या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून यासाठी दिघा भागातील सिडको मालकीची ५६६ व ३५३ चौरस मीटर जमीन रेल्वे विकास कॉर्पोरेशनला हवी होती. तशी मागणी त्यांनी २०१८ मध्ये सिडकोला केल्याने सिडकोने ही जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. या जमिनीवर सिडकोने कोणताही विकास आराखडा तयार केलेला नाही. या सुमारे एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळात पादेशिक उद्यान व काही निवासी क्षेत्राचे आरक्षण टाकण्यात आले आहे. नवी मुंबई जमीन विल्हेवाट कायद्यानुसार सिडकोला जमिनीवरील आरक्षण बदलण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. सिडको ही शासकीय कंपनी असून केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी सिडको भाडेपट्टा करारावर (एका अर्थाने जमीन विक्री) जमीन देत आली आहे. सिडकोने मुंबई कॉर्पोरेशनला दिलेली ही जमीन २२ हजार ५०० चौरस मीटर दराने दिली असून त्यासाठी एमआरव्हीसीकडून २२ कोटी रुपये घेतले जाणार आहेत. सिडकोने ही जमीन ९० वर्षांच्या भाडेपट्टी करारावर दिली आहे. या क्षेत्रात असणाऱ्या झोपडय़ांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

प्रवाशांचा त्रास वाचणार

ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर सिडकोने थेट ऐरोली रेल्वे स्थानकाचा विस्तार केला आहे. त्यामुळे दिघा, इलटणपाडा, चिंचपाडा या नागरी वसाहतीत राहणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांना ऐरोली किंवा ठाणे या रेल्वे स्थानकांवर उतरून पुन्हा रस्ता प्रवास करावा लागत आहे. या ऐरोली-कळवा उन्नत मार्गामुळे हा प्रवाशांचा हा त्रास वाचणार आहे. हा प्रकल्प येत्या दोन ते तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

डहाणू मार्गाच्या विस्तारासाठी सिडकोने पालघरमधील जमीन दिल्यानंतर ऐरोली कळवा उन्नत मार्गासाठी ही जमीन देण्यात आली असून सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना सिडकोचे सहकार्य हे नेहमीच राहणार आहे. या उन्नत मार्गामुळे ठाण्याकडे जाणारा प्रवाशांचा लोंढा कमी होऊन कल्याण, डोंबिवलीतील नोकरदार थेट नवी मुंबईत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहे.

– डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको