05 December 2019

News Flash

खारघर हिलवर ‘मनोरंजन’ स्थळ

२५० एकर जमिनीचा विकास करण्याचा सिडकोचा प्रयत्न

२५० एकर जमिनीचा विकास करण्याचा सिडकोचा प्रयत्न

विकास महाडिक, नवी मुंबई

नियोजित नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या बांधकाम उंची मर्यादेमुळे अडगळीत पडलेला बेलापूर येथील पारसिक डोंगर माथ्यावरील २५० एकर जमिनीचा ‘खारघर हिल प्लॅटय़ू प्रकल्प’ पुनर्जीवित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हॉलीवूड हिलच्या धर्तीवर या ठिकाणी बॉलीवूड हिल निर्माण करण्याचा सिडकोचा प्रस्ताव होता. त्यासाठी दीड हजार कोटी रुपयांचा देकार नऊ वर्षांपूर्वी आला होता पण विमानतळ परिसरातील बांधकाम उंची मर्यादेमुळे हा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ सिडकोवर आली होती.

नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी राज्य शासनाने सिडकोला ३४४ चौरस किलोमीटर जमीन संपादन करून दिलेली आहे. यात बेलापूर टेकडी आणि पांडवकडा या दरम्यान असलेल्या २५० एकर शासकीय जमिनीचा समावेश आहे. शहराच्या वर्दळीपासून दूर असलेल्या या जमिनीचा परिसर हा शांत, सुंदर आणि निसर्गसंपदेने नटलेला आहे. या नयनरम्य जमिनीचा वापर करता यावा म्हणून सिडकोने नोव्हेंबर २००८ रोजी येथील २५० एकर जमिनीवर एक ‘थीम सिटी’चा प्रस्ताव तयार केला. त्याला राज्य शासनानेदेखील मान्यता दिली आहे. जानेवारी २०१० मध्ये या जमिनीसाठी सिडकोने निविदेद्वारे बोली मागविल्यानंतर या जमिनीला ‘फ्युचर सिटी प्रॉपर्टी लिमिटेड’ या कंपनीचा एक हजार ५३० कोटी रुपयांचा देकार आला होता. या स्पर्धेत इंडिया बुल, विमानतळाची उभारणी करणारी जीव्हीके आणि एचसीसी या तीन कंपन्यादेखील होत्या. मात्र यात सिटी प्रॉपर्टीने बाजी मारली होती.

याच वेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानतळाच्या आजूबाजूच्या २५ किलोमीटर परिघातील परिसरावर १२० मीटर बांधकाम उंचीची मर्यादा घातली. त्यामुळे इतर प्रकल्पांप्रमाणे हा प्रकल्प त्याच क्षणी रखडला. या जमिनीवर मनोरंजन अथवा आयटी क्षेत्र उभारण्याचा प्रस्ताव होता पण आयटी क्षेत्राला आलेली मरगळ पाहता मनोरंजन क्षेत्राला प्राधान्य दिले जाणार होते. यात अमेरिकेतील हॉलीवूड हिलच्या धर्तीवर या ठिकाणी बॉलीवूड हिल उभारले जाणार होते. यातील ६० टक्के जमीन ही वाणिज्यिक वापरासाठी तर ४० टक्के जमीन ही निवास क्षेत्रासाठी वापरली जाणार होती. समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंच असलेल्या या जमिनीवरील तापमान हे शहरापेक्षा कमी आहे. त्यामुळे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मिनी हिलस्टेशनला मागणी असल्याचा सिडकोचा दावा आहे. त्यामुळे श्रीमंतांची वसाहत निर्माण केली जाणार होती. सिडकोच्या या संकल्पनेला नागरी उड्डाण मंत्रालयाने उंची मर्यादेने सुरुंग लावल्याने सिडकोने हा प्रकल्प अडगळीत टाकून ठेवला होता. विमानतळ परिसरात १२० मीटर उंचीपेक्षा जास्त उंची असलेल्या प्रकल्पांना मंजुरी दिली जात नाही. अगोदरच समुद्र सपाटीपासून २०० मीटर उंच असलेली ही जमीन १२० मीटर उंची मर्यादेमुळे कवडीमोल झाली आहे. सिडकोने एक हजार ५३० कोटी रुपयांचा देकार दिलेल्या कंपनीला त्यांचा देकार परत केलेला आहे. त्यामुळे वापराविना पडून असलेल्या या विस्र्तीण जमिनीचा वापर करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी चंद्र यांनी या जमिनीची पाहणी केली. दिल्लीतील शासकीय सेवेत बराच काळ घालवलेले चंद्र यांनी या जमिनीवरील प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून येथील प्रकल्पासाठी उंची मर्यादा शिथिल केल्यास या ठिकाणी मनोरंजन प्रकल्प राबविता येण्यासारखा आहे. त्याची चाचपणी सिडकोने पुन्हा सुरू केली आहे.

फिल्म सिटीच्या धर्तीवर प्रकल्प

* मुंबईतील फिल्म सिटीप्रमाणे हा भाग विकसित करता येण्यासारखा आहे. अगोदर या प्रकल्पासाठी एक वाढीव चटई निर्देशांक मंजूर करून बंगलो, स्टुडिओ उभारण्यात येणार होते. पण बांधकाम उंची मर्यादेमुळे यातील काही प्रकल्पांना मूठमाती देऊन हॉलीवूड हिलसारखी काही शूटिंग स्थळे निर्माण करता येण्यासारखी आहेत.

* यात शूटिंगसाठी लागणारी कृत्रिम धबधबे, तलाव, रेल्वे स्थानके, अशी उंची नसलेली स्थळे तयार करता येणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाकडे विशेष परवानगी मागून कमी उंचीच्या बांधकामाला परवानगी घेतली जाणार आहे. यासाठी या प्रकल्पांना स्टेट आर्टचा दर्जा दिला जाणार आहे.

*  उंची मर्यादा आल्याने या जमिनीची दर कमी झालेला आहे, पण या ठिकाणी मनोरंजन क्षेत्राला वाहणारा एखादा प्रकल्प उभा राहू शकतो, असा विश्वास सिडकोला आहे. या जमिनीचा लवकर वापर न झाल्यास त्या ठिकाणी अतिक्रमण होण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.

खारघर हिल प्लॅटय़ू प्रकल्पाच्या जमिनीची पाहणी करण्यात आलेली आहे. सिडकोच्या अखत्यारीत ही सुंदर जमीन आहे. नवी मुंबई विमानतळाच्या नैना क्षेत्रासाठी असलेली बांधकाम उंची मर्यादा अबाधित ठेवून या ठिकाणी मनोरंजन क्षेत्राला वाहणारा एखादा प्रकल्प उभारता येण्यासारखा आहे. त्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.

– लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

First Published on February 6, 2019 2:06 am

Web Title: cidco tried to develop kharghar hill plateau project on 250 acres of land
Just Now!
X