सिडको प्रशासनाने खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या स्पर्धेत उतरत नवी मुंबईकरांसाठी व्हॅलीशिल्प या आधुनिक शैलीतील गृहप्रकल्पाची उभारणी केली, त्यातील लाभार्थीना घरांचा ताबाही दिला, मात्र त्यातील अद्ययावत सुविधा पूर्णपणे सुरू झाल्या नसल्याचे उघड झाले आहे. जलतरण तलाव आणि टेनिस कोर्ट आदी सुविधा केवळ दिखाव्यासाठी असून त्या लवकरात लवकर खुल्या कराव्यात तसेच पथदिव्यांची सोय करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.
तेराशेहून अधिक सदनिकांचा प्रकल्प असणाऱ्या खारघरच्या व्हॅलीशिल्प संकुलामुळे शेकडो सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. ५१ लाखांपासून एक कोटी पाच लाख रुपयांपर्यंतच्या किमतीची ही सुसज्ज घरे सोडत पद्धतीने लाभार्थीना मिळाली. या संकुलाची ओळख सामान्यांसोबत उच्चभ्रूंची वसाहत अशी निर्माण झाली. २४ भव्य इमारती, इमारतींच्या मधोमध भव्य तीनमजली वाहनतळ आणि त्या वाहनतळाच्या माथ्यावर परदेशातील उद्यानांच्या धर्तीवर भला मोठा बगीचा, बगीच्याभोवती जॉिगग ट्रक अशा सुविधा या संकुलाचे वैशिष्टय़ आहे. या बागेत सोनचाफ्याची झाडे लावण्यात आली आहेत. त्याच मजल्यावर व्यायामशाळा, क्लब हाऊस, वातानुकूलित सभागृह आणि पंचतारांकित श्रेणीतील हॉटेलसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक घरमालकाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक इमारतीच्या तळमजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. सुरक्षेची विशेष खबरदारी घेताना सिडकोने प्रत्येक मजल्यावर अग्निशमन यंत्रणाचे जाळे पसरल्याचे येथे पाहायला मिळते. बी. जी. शिर्के कंपनीने सिडकोचा हा गृहनिर्माण प्रकल्प उभारला आहे.
सर्वसामान्यांनी गृहकर्जाच्या साहाय्याने ही घरे घेतली आहेत. काहींचे हफ्ते दीड वर्ष आधीच सुरू झाले. शेकडो रहिवाशांनी घरांचा ताबा घेतला आहे. ताबा देताना सिडकोने देखभाल व दुरुस्तीपोटी दोन वर्षांची रक्कम वसूल केली आहे. कर्जाचे हफ्ते सुरू झाल्याने सुमारे ७० सदनिकाधारक येथे राहण्यास आले आहेत. येथे एकूण २४ इमारती आहेत. परंतु प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र रखवालदार नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नियंत्रणासाठी व्यक्ती नेमलेली नाही, व्हॅलीशिल्प प्रकल्प ते खारघर वसाहतीचा मुख्य रस्ता या एक किलोमीटर अंतरावरील मार्गावर पथदिव्यांची सोय नाही. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर सिडकोने गाळे बांधलेले आहेत, मात्र त्यातील एकाचीही विक्री न झाल्याने या रहिवाशांना किराणा माल वा दुधासाठी दोन किलोमीटर लांब जावे लागते. या संकुलातील तरणतलाव व टेनिस कोर्ट सुरू होण्यास अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. या पाश्र्वभूमीवर सिडकोने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी या सदनिकाधारकांनी केली आहे.