उरणच्या द्रोणागिरी नोड परिसरातील दळणवळणासाठी सिडकोने कोटय़वधी रुपये खर्च करून रस्ते तयार केलेले आहेत. या रस्त्यात खोदकाम करून जलवाहिन्या तसेच केबल टाकण्याचे काम सुरू आहे. द्रोणागिरी नोडमधील बीपीसीएल कंपनीजवळील रस्त्यावर महिनाभरापासून भररस्त्यात भलामोठा खड्डा खोदला आहे. या खड्डय़ात रात्रीच्या वेळी कामावरून परतणारा एक कामगार पडल्याची घटना घडल्यानंतरही सिडकोचे त्याकडे दुर्लक्षच आहे. उरणच्या द्रोणागिरी नोडमधील अनेक रस्त्यांतून रस्ते तयार केल्यानंतरच जलवाहिनीसाठी खोदकाम करून रस्ते खराब का केले जातात, असा सवाल भेंडखळ येथील चंद्रकांत ठाकूर यांनी केला आहे. येथील भारत पेट्रोलियम व द्रोणागिरी नोड तसेच उरणला जोडणाऱ्या रस्त्यात खोदण्यात आलेल्या खड्डय़ांमुळे रात्री प्रवास करणाऱ्यांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात सिडकोच्या द्रोणागिरी नोडचे अधीक्षक अभियंता राजाराम नायक यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्यात जलवाहिन्या किंवा केबल टाकण्याची परवानगी वाहतूक विभागाकडून दिली जाते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.