26 November 2020

News Flash

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये सिडको सल्लागार होणार

बीपीटीच्या ‘मेक ओव्हर’ प्रकल्पात सिडको सल्लागार म्हणून भाविष्यात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

बीपीटीच्या ‘मेक ओव्हर’ प्रकल्पात सिडको सल्लागार म्हणून भाविष्यात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य शहर प्रशासक म्हणून दोन वेळा कार्यभार सांभाळणारे संजय भाटिया आता केंद्र सरकारच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट या महत्त्वाकांक्षी बंदर प्रकल्पात अध्यक्ष म्हणून रुजू झाल्याने बीपीटीच्या ‘मेक ओव्हर’ प्रकल्पात सिडको सल्लागार म्हणून भाविष्यात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिडकोने नियोजन आणि पायाभूत सुविधांमध्ये नमूद केलेली प्रणाली अधिक विकसित करावी जेणेकरून बीपीटींच्या निविदेत सिडको सल्लागार म्हणून काम करू शकते असे संकेत भाटिया यांनी निरोप संदेशात दिला आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मोठय़ा प्रमाणात जमीन शिल्लक असून केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बीपीटीचा मेक ओव्हर करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने देशातील काही सक्षम सनदी अधिकाऱ्यांची यादी निश्चित केली होती. त्यात भाटिया यांचा समावेश होता. भाटिया यांना केंद्रातील एखादी जबाबदारी देण्यासाठी दिल्लीला बोलविण्यात येणार होते, पण कौटुंबिक कारणामुळे त्यांच्या विनंतीनुसार त्यांना केंद्र सरकारच्या मुंबईतील प्राधिकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सिडको छत्तीसगडसारख्या नवीन राज्याची राजधानी व दहा शहरांच्या प्रकल्पावर सल्लागार म्हणून काम करीत असून पालघरसारख्या नवीन जिल्ह्य़ाचा विकास आराखडा तयार करीत आहे. त्यामुळे मोठमोठे प्रकल्प उभारण्याचा अनुभव असलेल्या सिडकोने यानंतर देश-विदेशातील प्रकल्पांवर सल्लागार म्हणून काम करण्याचा सल्ला देताना भविष्यात बीपीटीच्या निविदात सहभाग घ्यावा अशी अपेक्षा भाटिया यांनी सर्व अधिकाऱ्यांना पाठवलेल्या लघुसंदेशात व्यक्त केली आहे.
सिडको हे आपले पहिले प्रेम असल्याचेही भाटिया यांनी नमूद केले आहे. त्यामुळे बीपीटीच्या भविष्यातील अनेक प्रकल्पांवर सिडको सल्लागार म्हणून कामगिरी करण्याची शक्यता आहे.

पुढील आठवडय़ात निरोप समारंभ
आपल्या कारकीर्दीतील तीन वर्षांत सिडकोची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणारे भाटिया सोमवारी सिडकोत येणार होते. त्यासाठी प्रशासानाने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती; पण भाटिया यांना अचानक मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामासाठी दिल्लीला जावे लागल्याने त्यांचे बेलापूरमध्ये येणे रद्द झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला. विक्रीकर विभागातून भाटिया यांची बदली व्हावी म्हणून सत्यनारायण मांडण्यात आला होता, पण ते आणखी काही काळ सिडकोत राहावेत यासाठी सिडको कर्मचाऱ्यांनी स्नेहसंमलेनात अपेक्षा व्यक्त केली होती. भाटिया यांचा निरोप संमारंभ आता पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2016 3:45 am

Web Title: cidco will be consultant in mumbai port trust
टॅग Cidco
Next Stories
1 काँग्रेसचे हात दाखवून अवलक्षण
2 रानसईच्या दोन आदिवासी वाडय़ांवर टँकरने पाणीपुरवठा
3 नवी मुंबई पालिका स्थायी समितीत विकासकामांना मंजुरी
Just Now!
X