05 June 2020

News Flash

सिडको शासनाला आर्थिक मदत देणार

सिडकोच्या तिजोरीत ठेवी रूपात नऊ हजार कोटी रुपयांची रक्कम पडून आहे.

नवी मुंबई :  राज्य शासनाला करोना संसर्गाविरोधात लढण्यासाठी राज्यातील श्रीमंत महामंडळ असलेले सिडको महामंडळ आर्थिक मदत करणार आहे. यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सिडकोच्या तिजोरीत ठेवी रूपात नऊ हजार कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. पन्नास वर्षांपूर्वी राज्य शासनाने दिलेल्या चार कोटींच्या आर्थिक भाग भांडवलानंतरच सिडको आज कोटय़वधी मालमत्तेची शासकीय कंपनी म्हणून उदयाला आलेली आहे.

करोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून मोठय़ा प्रमाणात निधी वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी वापरण्यात येत आहे. याशिवाय अनेक सेवासुविधांसाठी शासनाला स्थानिक स्वराज्य संस्थांकडे निधी वर्ग करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीत काही दिवसांनी खडखडाट जाणवणार आहे.

राज्य शासनाचे एक श्रीमंत महामंडळ म्हणून राज्यात परिचित असलेल्या सिडकोचा सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा निधी हा विविध वित्तसंस्थांमध्ये गुंतवणूक करण्यात आला आहे. विमानतळ, रेल्वे, मेट्रो, कॉर्पोरेट पार्क असे अनेक प्रकल्प सध्या सुरू असून त्यांच्या उभारणीत सिडकोचा काही निधी लागणार असल्याने हा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

मात्र राज्य शासनाच्या सध्याच्या आर्थिक आपत्कालीन स्थितीत सिडकोकडे असलेल्या निधीपैकी काही प्रमाणात निधी शासनाला दिला जाणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. टाळेबंदी उठल्यानंतर सर्वप्रथम सिडकोतील कर्मचारी व अधिकारी आपला पगार मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्याचा निर्णय तातडीने घेणार आहेत. सिडकोच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची सातवा वेतन आयोगामुळे वेतनाची मर्यादा काही लाखांच्या घरात गेली आहे.

त्यामुळे या वेतनातूनही मुख्यमंत्री साहाय्यता निधीला चांगली रक्कम मिळणार आहे. वेतनाबरोबरच सिडकोच्या निधीतील काही निधी शासनाला अशा संकटस्थितीत वर्ग केला जाणार आहे. यापूर्वी सिडकोने राज्य शासनाच्या आदेशाने समृद्धी, वाशी खाडी पूल, पाम बीच मार्ग विस्तार आणि तुड्टरे ते खारघर पर्यायी मार्ग या विकास प्रकल्पांना निधी दिलेला आहे. त्यामुळे एका अर्थाने शासनाच्या मालकीची कंपनी असलेल्या सिडकोतील निधी राज्य शासन हक्काने वर्ग करून घेऊ शकणार आहे, मात्र त्यासाठी सिडको संचालक मंडळाची अनुमती लागणार आहे. ती टाळेबंदीनंतर दिली जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 1:41 am

Web Title: cidco will provide financial support to the maharashtra government zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus lockdown : संचारबंदीच्या काळात तृतीयपंथीयांवर उपासमारीचे संकट
2 ‘एपीएमसी’ शनिवारपासून बंद
3 Coronavirus : ७२ वर्षीय बाधिताची करोनावर मात
Just Now!
X