प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना विमानतळ प्रकल्पातील स्थापत्य कामे योग्यपणे करता यावीत यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेतल्यानंतर नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांनी सामूहिक शहर विकासासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी सिडको पुढील महिन्यात चार दिवसीय कार्यशाळा घेणार आहे. या कार्यशाळेत खालापूरच्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यांच्यासाठी एक दिवस खास राखून ठेवण्यात आला आहे. ६० हजार हेक्टर क्षेत्रफळातील शेतकऱ्यांनी गुजरातच्या धर्तीवर छोटय़ा-मोठय़ा शहरांचा विकास करावा, यासाठी सिडको प्रयत्नशील आहे. या प्रकल्पात सिडको केवळ पायाभूत सुविधा देणार असून सामूहिक विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांना बांधकामासाठी पावणेदोन वाढीव चटई निर्देशांक दिले जाणार आहे.
पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी स्वत: लक्ष घातले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दर १५ दिवसांनी कार्यअहवाल सादर केला जात आहे. तर नैना शहर प्रकल्पावर सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकल्पातील ६० हजार हेक्टर जमिनीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सिडको करणार असून यातील शेतकरी गुजरातच्या धर्तीवर पुढे आल्यास त्यांना वाढीव एफएसआय देण्याची तयारी सिडकोने केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील ५० टक्के जमीन सिडकोला दिल्यास त्या बदल्यात सिडको त्यांना हा पावणेदोन एफएसआय देणार आहे. यासाठी प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पाबद्दल अवगत केले जात असून, पनवेल तालुक्यातील गावांमध्ये जाऊन त्याचे सादरीकरण केले जात आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना एकत्र येण्याची आवश्यकता असून दहा हेक्टर जमीन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना सिडको हे एफएसआय पॅकेज देणार आहे. अनेक शेतकऱ्यांना सिडकोच्या या योजनेबद्दल माहिती नाही. त्यामुळे ६ ऑक्टोबरपासून वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात ही चार दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी नैना व विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना या सामूहिक विकासाबद्दलची माहिती दिली जाणार आहे. विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के योजनेचे भूखंड पुष्पकनगर या सिडकोच्या नवीन नोडमध्ये देण्यात आले आहेत. हे भूखंड शेतकऱ्यांनी न विकता स्वत: विकास करावा यासाठी सिडको प्रबोधन करीत आहे. या निर्णयावर बांधकाम व्यावसायिक नाराज झाले आहेत. प्रबोधनाचे हे कार्य हाताशी घेतलेल्या दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी हे बांधकाम व्यावसायिक देव पाण्यात ठेवून बसले आहेत. त्यासाठी त्यांनी दिल्लीपासून प्रयत्न केल्याचे समजते, मात्र या दोन्ही प्रकल्पांना महत्त्व देणारे मुख्यमंत्री फडणवीस या दबावाला बळी पडले नसल्याचे कळते. त्यामुळे या कार्यशाळेत ८ ऑक्टोबरला या शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी कायमस्वरूपी सल्लागार समिती नेमली जाणार आहे, तर ९ ऑक्टोबरला सांगडे गावाला प्रत्यक्ष भेट दिली जाणार असून तेथे शेतकऱ्यांच्या या प्रकल्पाविषयी सादरीकरण केले जाणार आहे.
नैना प्रकल्पात सहा तालुक्यांतील २७० गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे खालापूर तालुक्यातील ११ शेतकरी जमिनी घेऊन पुढे सरसावले आहेत. त्यांना या प्रकल्पाची इत्थंभूत माहिती देण्यासाठी ७ ऑक्टोबर हा दिवस राखून ठेवला आहे.