18 April 2019

News Flash

सिडको घरांसाठीच्या अर्जाची मुदत आज संपणार

यापूर्वी गृहप्रकल्पातील घरे बांधून पूर्ण झाल्यानंतर त्यांची विक्री प्रक्रिया सुरू केली जात होती.

( संग्रहीत छायाचित्र )

शुक्रवापर्यंत एक लाख २७ हजार अर्ज दाखल

सिडकोने खारघर, कळंबोली, तळोजा, घणसोली आणि द्रोणागिरी या नोडमध्ये सुरू केलेल्या महागृहनिर्मितीतील १४ हजार ८३८ घरांसाठी अर्ज करण्याची १५ सप्टेंबर ही शेवटची मुदत शनिवारी रात्री ११.५९ मिनिटाला संपणार आहे. हे अर्ज ऑनलाइन दाखल केले जात असल्याने रात्री बारानंतर कोणताही अर्ज संगणक स्वीकारणार नाही. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १५ हजार घरांसाठी एक लाख २७ हजार अर्ज नोंदणी शुल्क भरून दाखल झालेले आहेत. तर विनाशुल्क १ लाख ७८ हजार अर्ज भरले गेले आहेत.

४८ तासांत यातील अनेक जण आपले नशीब अजमावण्याची शक्यता असून या घरांसाठी आणखी दहा ते पंधरा हजार अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी गृहप्रकल्पातील घरे बांधून पूर्ण झाल्यानंतर त्यांची विक्री प्रक्रिया सुरू केली जात होती. नव्याने आलेले व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घर बांधणी सुरू असतानाच ह्य़ा घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला असून ही सर्व प्रक्रिया पहिल्यांदाच ऑनलाइन करण्यात आलेली आहे. या योजनेतील पाच हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव ठेवण्यात आली असून शिल्लक घरे सर्वासाठी खुली करण्यात आलेली आहेत.

२६० चौरस फूट ते ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची असलेली ही घरे १८ ते २९ लाखांच्या घरात आहेत. मागील महिन्यात १५ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महागृह प्रकल्पातील घरांच्या विक्रीचा शुभांरभ केला आहे. गेले एक महिना या प्रकल्पातील घरांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.

ग्राहकांची अडचण

यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची मुदत असून शनिवारी रात्री तिची ११.५९ मुदत संपणार असल्याचे पणन व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी सांगितले. या प्रकल्पातील पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव ठेवलेल्या घरांचे आरक्षण करताना वास्तव्याचा दाखला, देशात कुठेही घर नसल्याचे प्रमाणपत्र, सादर करताना ग्राहकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या घरांना कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून सोडतीत घर लागल्यानंतर प्रमाणपत्र सादर करताना ग्राहकांची ससेहोलपट होणार आहे. देशात कुठेही घर नसल्याचे प्रमाणपत्र म्हाडाकडून घेण्याची अट आहे.

भूमीपुत्रांच्या समस्या सोडविण्याचे सिडको अध्यक्षांसमोर आव्हान

जगदीश तांडेल, उरण

नवी मुंबईच्या उभारणीला ४८ वर्षे पूर्ण होत असताना ज्या बेलापूर पट्टीसह, उरण व पनवेल तालुक्यातील ९५ गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर नवी मुंबई उभारण्यात आलेली आहे. त्यांचेच अनेक प्रश्न अर्धशतकानंतरही प्रलंबित आहेत. अशा वेळी प्रथमच स्थानिक भूमीपुत्र असलेले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने प्रकल्पग्रस्तांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने उरणसह पनवेलमधील सिडकोबाधित विभाग विकासापासून आजही वंचित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची नवनिर्वाचित अध्यक्षांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यापूर्ण होतील अशी आशा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईतील बेलापूर पट्टी तर पनवेलमधील खारघर, कामोठे परिसरात सिडकोने विकास केला आहे. मात्र उर्वरीत परिसरात आजही विकासाची प्रतीक्षा कायम आहे. यात प्रामुख्याने १९९६ला लागू झालेल्या साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे वाटप आजही प्रलंबित आहे. २००७ मध्ये उरणमधील ज्या सिडको बाधितांना साडेबारा टक्के भूखंड जाहीर केलेले आहेत, असे शेतकरी भूखंडाच्या प्रतीक्षेत आहेत. खासकरून द्रोणागिरी नोड परिसरातील सिडको बाधित गावांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यांच्यासह इतर नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव गावठाणाची मागणी मान्य झालेली असली तरी त्याची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संभ्रमात आहेत.

१८ वर्षे विनाउद्योग

प्रकल्पबाधितांच्या साडेबारा टक्केच्या पात्रतेतून त्यांच्या घरांच्या बांधकामांच्या बदल्यातील भूखंड सिडकोकडून वळते केले जात आहेत. याचा फटका भूमीपुत्रांना सहन करावा लागत आहे. दुसरीकडे २०१०ला सिडकोने नवी मुंबईतील द्रोणागिरी, उलवे तसेच कळंबोली नोडमधील विकसित भूखंड नवी मुंबई सेझला उद्योग व त्यातून भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी दिली होती. मात्र गेल्या १८ वर्षांत एकही उद्योग किंवा रोजगार निर्माण झालेला नाही. सध्या बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन विभागाकडे वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात दाखल केलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे निकाल लागलेले आहेत. त्यांचे कोटय़ावधी रुपये सिडकोकडून जमा होणे बाकी आहे. अशा एक ना अनेक समस्या भेडसावत असताना कुणी तरी निर्णय घेणाऱ्या जागेवर आल्याने प्रकल्पग्रस्तांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

First Published on September 15, 2018 3:42 am

Web Title: cidcos home grown application deadline ends today