पंतप्रधान आवास योजनेसाठी पाच हजार घरे

खारघर, तळोजा, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या सिडको नोडमध्ये बांधण्यात येणाऱ्या सुमारे पंधरा हजार घरांपैकी पाच हजार घरे ही सिडकोने पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव ठेवली आहेत. ही सर्व घरे अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत. राज्यातील पहिल्या महागृहनिर्मितीतील घरांसाठी १३ ऑगस्टपासून अर्ज मागविले जाणार आहेत पण या विक्रीसाठी राज्य शासनाच्या हिरव्या कंदिलाचा आवश्यकता असून सिडकोने सर्व तयारी सुरू केली आहे. १५ ऑगस्टच्या आसपास अर्ज विक्री सुरू होणार असल्याचे कळते.

सिडकोने गेली काही वर्षे गृहनिर्मितीकडे दुर्लक्ष केले होते. आता मात्र गृहनिर्माण योजना जोरात राबविण्याच निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश गृहनिर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खारघर, तळोजा, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी नोडमध्ये सध्या गृहनिर्मिती सुरू आहे. त्यासाठी या महिन्यात अर्ज मागविले जाणार आहेत. याशिवाय अडीच हजार शिल्लक घरे ‘जैसे थे’ आहेत. २० सोसायटय़ांचे भूखंड वितरित केले जाणार आहेत. १५ हजार घरांच्या निर्मितीबरोबरच चाळीस हजार अतिरिक्त घरे बांधण्यासाठी जमिनीचा शोध घेतला जात आहे. सध्या पंधरा हजार घरांचे काम प्रगतीपथावर आहे. चंद्र यांनी नुकतीच या प्रकल्पांची पाहणी केली. यापूर्वी घरे पूर्ण बांधून झाल्यावर अर्ज विक्री केली जात होती, पण आता प्राथमिक स्थितीत असलेल्या घरांची विक्री करण्याचा निर्णय लोकेश चंद्र यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे ग्राहकांना टप्प्याटप्प्याने पैसे भरणे सोपे जाईल, जादा व्याज आकार पडणार नाही.

सध्याच्या १५ हजार घरांपैकी पाच हजार घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव ठेवली जाणार आहेत. ही सर्व घरे अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी असून २५.८१ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या घरांची किंमत १८ ते १९ लाख रुपये असणार आहे. या घरांसाठी अनामत रक्कम म्हणून पाच हजार रुपये भरावे लागणार आहेत. अल्प उत्पन्न गटातील नागरिकासाठी दहा हजार घरे असून त्यांची किंमत २५ ते २९ लाख रुपयांच्या आसपास असणार आहे. अनामत रक्कम म्हणून २५ हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. या घरांचे क्षेत्रफळ २९.८२ चौरस मीटर असणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी देशात कुठेही घर नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दीड लाख व राज्य सरकार कडून एक लाख रुपये असे अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

चार ते पाच लाख अर्ज येण्याची शक्यता

या महिन्यात अर्ज विक्री झाल्यानंतर १५ हजार घरांसाठी चार ते पाच लाख अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांची छाननी केल्यानंतर तीन महिन्यांनी या अर्जाची सोडत जाहीर केली जाणार आहे. पंधरा हजार घरांच्या या सोडतीबरोबरच सिडको आणखी ४० हजार घरांची अर्ज विक्री करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत सिडकोची महागृहनिर्मिती सोडत होणार असून त्यामुळे खासगी विकासकांच्या घरांचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.