प्रकल्पग्रस्तांचा आरोप; पालकमंत्री पाडकामांना लवकरच भेट देणारू

जानेवारी २०१३ नंतरच्या बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालविण्याचा ठाम निर्णय सिडकोने घेतला असून नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील ७५८ बेकायदेशीर बांधकामांची यादी तयार केली आहे. त्यातील सव्वातीनशे बेकायदेशीर बांधकामे तोडण्यात आली असून ही बांधकामे तोडताना सिडको दुजाभाव करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त नेत्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या कारवाईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष केले जात असल्याचे आढळून आल्याने शिवसैनिकांच्या तक्रारीवरून पालकमंत्री एकनाथ शिंदे या पाडकामांना भेट देणार आहेत.

नवी मुंबईत बेकायदेशीर बांधकामांचा भस्मासूर उभा राहिला आहे. दिघा प्रकरणात सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील या बेकायदेशीर बांधकामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे स्थानिक प्राधिकरणांनी या बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली असून सिडकोने जानेवारी २०१३ नंतरच्या बेकायदेशीर बांधकामांची एक यादी तयार केली आहे. राज्य शासनाने प्रकल्पग्रस्तांनी डिसेंबर २०१२ पर्यंतची गरजेपोटी बांधलेली वीस हजार बेकायदेशीर बांधकामे गतवर्षी कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिडको गुगल अर्थचा आधार घेऊन जानेवारी २०१३ नंतरच्या बेकायदेशीर बांधकामांना रीतसर नोटिसा बजावून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करीत आहे.

गोठवली, घणसोली, तळवली ह्य़ा गावात फिफ्टी फिफ्टीच्या नावाखाली अशी खूप मोठय़ा प्रमाणात बांधकामे झाली आहेत. सिडकोच्या रडारवर ही सर्व बांधकामे असून त्यावर आठवडय़ातून तीन दिवस कारवाई केली जात आहे. यात सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथक दुजाभाव करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी सुरू केला आहे. एखाद्याला लक्ष्य करावे, अशा प्रकारे ही कारवाई केली जात असून शेजारी त्याच काळात उभे राहिलेल्या बेकायदेशीर बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळून आले आहे. घणसोलीत भरत पांडुरंग पाटील यांच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली जात असताना जवळच पाच मजल्याची इमारत याच काळात उभी राहिलेली दिसून येत आहे. त्याकडे या पथकाने ढुंकूनही पाहिले नाही, असा आरोप आहे.

हीच स्थिती तळवळीत गजानन राजाराम पाटील यांच्या इमारतीवर कारवाई करताना करण्यात आली आहे. या प्रकल्पग्रस्ताने गावातील जुन्या घराच्या जागी नवीन इमारत बांधली होती. त्यावर सिडकोने हातोडा चालविला आहे. रबाले येथे प्रदीप पाटील व गोठवली येथील सुनील शेलार यांच्या कार्यालय व घरावर कारवाई करण्यात आली आहे. कर्मधर्मसंयोगाने कारवाई करण्यात आलेले हे सर्व प्रकल्पग्रस्त शिवसैनिक आहेत. सिडकोने तयार केलेल्या यादीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करण्यासाठी प्रकल्पग्रस्त सहकार्य करीत आहेत. याचा अर्थ सर्व सहन केले जाईल असा होत नाही, असा इशारा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनी दिला आहे. सिडकोची कारवाई हेतुपरस्पर असल्याने पालकमंत्र्यांकडे याची तक्रार करण्यात आली आहे.