पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी पनवेल नगर परिषदेने पाणी परिषद भरवली; परंतु पाणी बचतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या परिषदेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी वेळवर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सुमारे एक तास उशिराने सुरू झालेल्या या परिषदेत नागरिकांनी सारा संताप उपस्थित मार्गदर्शकांवर काढला. पाणी परिषद आयोजित करून रस्ता उद्घाटनाचा कार्यक्रम कसा काय उरकला जातो, आधी परिषद मग उद्घाटन असा क्रम आमदारसाहेबांनी ठेवला असता तर उपस्थितांची गैरसोय झाली नसती, अशा प्रश्नांच्या फैरींना लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागले.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात भरलेल्या पाणी परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर होते. परिषद आयोजित करून लोकांचे म्हणणे ऐकून त्यांच्यात पाणी बचतीविषयी जागृती करणे, अशा व्यापक उद्देशाने नगर परिषदेचे सदस्य शिवदास कांबळे यांनी तशी मागणी केली होती. बऱ्याच दिवसांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी लोकांच्या समस्यांवर उपाय सांगण्यासाठी एकत्र आले आहेत, याबद्दल नागरिकांमध्ये बऱ्यापैकी उत्साह होता. त्यांनी थेट आमदार आणि नगर परिषदेच्या सदस्य आणि अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. यात विरोधी पक्षनेते आघाडीवर होते. परिषदच पाण्याचे नीट नियोजन करीत नाही. त्यामुळ काही रहिवाशांना पहाटे तीन वाजता पाणी भरायची वेळ येते. त्यामुळे पाण्याची वेळ ठरवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी यापुढे उदंचन केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी स्वच्छतेसाठी घरात वापरता येईल, असाही विचार मांडला. या वेळी प्रक्रिया केलेल्या पाण्याचे नमुने परिषदेत पाहणीसाठी ठेवण्यात आले होते.