१७ दिवसांच्या टाळेबंदीनंतर सामाजिक अंतर पाळत नागरिक बाजारात

नवी मुंबई</strong> : टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर सोमवारी नवी मुंबईत विविध ठिकाणी बाजार सुरू झाले. या वेळी नागरिकांनी सावधगिरी बाळगत बाजारात खरेदीला सुरुवात केली. अनेकांनी टाळेबंदीच्या धास्तीने सामाजिक अंतर पाळत खरेदी केली. शहरात ३ ते १० जुलै या काळात दहा दिवसांसाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ती सात दिवसांसाठी वाढविण्यात आली. या विरोधात व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.

पहिली टाळेबंदी उठविण्यात आल्यानंतर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रथम २९ जून ते ३ जुलै अशी सहा दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच वेळी इतर ठिकाणी नागरिकांच्या हालचालींवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नव्हते. मात्र, हा नियम बदलून लगेच दहा दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर सात दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली.  या निर्णयाला नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. याच काळात नवी मुंबई पालिका आयुक्तपदी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली. आयुक्तांनी २० जुलैपासून टाळेबंदीतील काही नियम शिथिल करण्यात आल्याचे जाहीर केले. सोमवार सकाळपासून दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणच्या बाजारात नागरिकांना खरेदीसाठी मुभा देण्यात आली. यात तयार कपडय़ांची दुकाने, वाहन दुरुस्ती करणारी दुकाने उघडण्यात आली. या काळात मुखपट्टी बांधून अनेकांनी सामाजिक अंतराचा नियम पाळला.  टाळेबंदीचे काही नियम शिथिल करण्यात आल्याने नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करता येईल. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून लोक खरेदी करीत आहेत, असे नवी मुंबई किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद जोशी यांनी सांगितले.बाहेर पडता येत नसल्याने कपडय़ांची खरेदी करता आली नाही. टाळेबंदी शिथिल करण्यात आल्याने मनाजोगते कपडे घेतले, असे अश्विनी पागे यांनी सांगितले.

२८६ नवे रुग्ण, ३४५ जनांचा मृत्यू 

नवी  मुंबईत सोमवारी २८६ नवे रुग्ण आढळले.त्यामुळे बाधितांची  एकूण संख्या ११,७१२ झाली आहे. शहरात दोघांचा मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३४५ झाली आहे.  शहरात आतापर्यत तब्बल ७,४१७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ३,९५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात प्रतिजन चाचण्या करण्यात येत आहेत.