प्रतिबंधित क्षेत्रांत नागरिक रस्त्यावर; पोलिसांची मवाळ भूमिका?

नवी मुंबई</strong> : करोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या  सात दिवसांच्या टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी नागरिक सर्वत्र फिरताना दिसत होते. पोलिसांनीही काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे चित्र होते. तुर्भे विभागात झोपडपट्टीचा मोठा भाग असल्याने टोळेबंदीतही काही नागरीक रस्त्यावरून फिरत होते.

दुचाकी वा अन्य वाहनांमधून कार्यालयात जाणाऱ्यांची प्रवेशबंदीमुळे पंचाईत झाली. मात्र पायी फिरणाऱ्यांनी बंद केलेल्या भागांत नियमांची पायमल्ली केली.

नवी मुंबईत सोमवारपासून सात दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.  ५ जुलै रोजी ती संपेल. ही टाळेबंदी शहरातील ४४ प्रतिबंधित क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. यासाठी दोन दिवस त्याची तयारी करण्यात आली. अतिसंक्रमित क्षेत्रातील स्थळांना बांबू रोवून तेथे प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. पालिका आयुक्तांनी  ऐरोली विधानसभा क्षेत्रातील कोपरखैरणे गावठाण भागाचा सोमवारी दौरा केला.

करावे, दिवाळे गावांत शिस्त

नव्या टाळेबंदीत दिवाळे, करावे  आणि तुर्भे येथे स्वयंशिस्त पाहायला मिळाली.गावांत नागरीकांनाही टाळेबंदीच्या नियमांचे पालन केले. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही गावात प्रवेश दिला जात नव्हता तर गावातूनही कोणाला बाहेर येऊ  दिले जात नव्हते. स्वयंपाकासाठी लागणारे गॅस सिलिंडरची वाहनेही गाडय़ाही गावाबाहेरच अडवण्यात येत होत्या. पालिकेने घरोघरी जाऊन समूह तपासणी सुरू केली असून प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी दिली.

उरणमध्ये नियमपालनात हलगर्जी

करोना विषाणूचा उरण तालुक्यात विविध गावात विस्तार होऊ लागला असून अडिचशेचा आकडा गाठला आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या विस्तारणाऱ्या विषाणूमुळे नागरीकांमध्ये धास्ती वाढू लागली आहे. असे असले तरी सुरक्षेसाठी अंतर ठेवणे,सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान,थुंकने आदीसह सुरक्षा म्हणून तोंड झाकण्याचीही तस्दी घेतांना नागरीक दिसत नाही. त्यामुळे केवळ धास्ती दाखविण्या पेक्षा करोनाचा मुकाबला करून तो रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.  उरणच्या बाजारात दररोज खरेदीसाठी होणारी गर्दी,गावागावातून सुरू असलेल्या तरूणांच्या मद्य पाटर्या,गटागटाने जमाणारे अनेक जण तसेच कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता वाहन चालवित असतांना थेट गुटखा थुंकणे,सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आदी प्रकारही राजरोसपणे सुरू आहेत. त्याचाही परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच गस्तीतही वाढ करण्यात आली आहे.

– पंकज डहाने, पोलीस उपायुक्त

कोरोनाचा वाढता प्रसार आटोक्यात आणण्यासाठी हि टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे यात नागरिकांचे सहकार्य सर्वात महत्वाचे आहे. या दरम्यान सर्वत्र निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे या शिवाय घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

-अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त

टाळेबंदी कुठे?

* बेलापूर विभागातील —दिवाळे गाव,करावे

गाव

* तुर्भे विभाग—तुर्भे स्टोअर,तुर्भे सेक्टर २१, तुर्भे गाव

* वाशी विभाग—जुहू गाव सेक्टर ११

* कोपरखैरणे विभाग — बोनकोडे व खैरणे गाव, कोपरखैरणे गाव

* घणसोली विभाग—रबाळे गाव

* ऐरोली—चिंचपाडा

आजपासून येथे टाळेबंदी

* बेलापूर —सेक्टर १ ते ९

* वाशी —वाशी गाव