10 July 2020

News Flash

माथाडी संघटनेत दुफळी

लाक्षणिक संपावरून कामगार नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे यांच्यात धुसफुस

प्रतिनिधिक छायाचित्र

लाक्षणिक संपावरून कामगार नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे यांच्यात धुसफुस

राज्यात ‘मविआ’चे सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले नाहीत, तोच कामगार मंत्र्यांविरोधात अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात माथाडी संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी लाक्षणिक संपाचे हत्यार उपसले आहे.त्यांच्या या निर्णयामुळे संघटनेत पुन्हा दुफळी माजण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

नरेंद्र पाटील यांची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षां बरोबर सारखीच जवळीक आहे. मात्र जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचे संबंध तुटलेले आहेत. राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आहेत.

‘महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट’, आणि ‘जनरल कामगार युनियन’ ही राज्यातील माथाडी कामगारांची मोठी संघटना आहे. या संघटनेचे दोन नेते नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात सध्या धुसफुस सुरू आहे. बलाढय़ माथाडी कामगार संघटनेमुळे पाटील यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. या संघटनेचे संस्थापक दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे या संघटनेवर त्यांचा प्रभाव आहे. शिंदे यांनी या संघटनेत तळागाळापासून काम करीत राज्याच्या मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. शिंदे यांचा हा राजकीय प्रवास पाटील यांना शह देणारा होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी विधान परिषदेतील आमदारकी पदरात पाडून घेतली. सहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात पाटील यांची भाजप सरकारमधील नेत्यांबरोबर जवळीक वाढली. माथाडी कामगारांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरची भांडीदेखील घासेन असे जाहीर करून पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्री जाहीर केली. त्यानंतर ही जवळीक अधिक वाढल्याने पाटील यांनी सातारा मतदारसंघातून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला. त्या अगोदर त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन फडणवीस यांनी त्यांची सामाजिक सोय केली होती. सातारा मतदारसंघ हा शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेच्या वाटय़ाला जात असल्याचे लक्षात येताच भाजपबरोबर सामंजस्य करार करून पाटील शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले. सातारा मतदारसंघातून त्यांचा दारुण पराभव झाला, पण लढवय्या नेता म्हणून त्याचा परिचय या निमित्ताने झाला. त्याच लढवय्या भूमिकेमुळे पाटील यांनी आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीविरोधात ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात रणशिंग फुंकण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.

भाजप ‘मविआ’ला कात्रजचा घाट दाखविण्याचा प्रयत्न करीत असताना केवळ राष्ट्रवादीच्या कोटय़ात असलेल्या कामगारमंत्र्याच्या विरोधात हा एल्गार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले आहे.

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आपण मुख्यमंत्री व कामगारमंत्र्यांना कामगारांच्या १०-१५ वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे, पण एक साधी बैठक लावण्याचे सौजन्य कामगारमंत्र्यांनी दाखवलेले नाही. त्यामुळे हे आंदोलन असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

उद्या संप

माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासन आणि संबंधितांकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माथाडी कामगारांनी  बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप पुकारणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नव्या सरकारवरून नेत्यांमध्ये दुमत

संपाची माहिती देण्यासाठी नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे हे माथाडी नेते उपस्थित होते. परंतु या वेळी दोन्ही नेत्यांच्या बोलण्यात तफावत आढळून आली. पाटील म्हणाले, की माथाडी कामगारांच्या समस्यांकडे कामगारमंत्री दुर्लक्ष करीत आहेत. तर दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी आमचे आंदोलन सरकारविरोधात नसून प्रशासनाविरोधात असल्याचे मत व्यक्त केले.  मंत्रालयातील अधिकारी  राज्य सरकारला माथाडी कामगारांच्या प्रश्नांबद्दल चुकीची माहिती देत  असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 4:14 am

Web Title: clash inmaharashtra rajya mathadi transport and general kamgar union over strike zws 70
Next Stories
1 प्रभागांचा पंचनामा : इमारती पाहून आजार बरे होत नाहीत!
2 ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने प्रवाशांची लूट
3 नवी मुंबईत भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेत
Just Now!
X