केंद्रीय समितीकडून सर्वेक्षणाला गुरुवारपासून सुरुवात

गेल्या वर्षी स्वच्छतेत देशात आठवा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकाविलेल्या नवी मुंबई पालिकेने देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी कंबर कसली असून स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. पालिकेच्या या प्रयत्नांचे केंद्रीय तसेच राज्य स्तरावरील उच्च अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. गेली अनेक दिवस सर्वेक्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नवी मुंबई पालिका प्रशासनाने गुरुवारी सुटकेचा नि:श्वास सोडला असून केंद्रीय पाहणी पथक शहरात डेरेदाखल झाले आहे. दोन-तीन दिवस हे पथक शहरातील स्वच्छतेची अचानक पाहणी करून गुणांकन देणार आहे. यात लोकसहभागाला जास्त महत्त्व आहे.

जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षण समितीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नवी मुंबई पालिका प्रशासनाने गुरुवारी अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. गेल्या वर्षी औरंगाबाद येथे समितीच्या सदस्यांना पटविण्यासाठी लक्ष्मी दर्शनाचा लाभ देण्यात आल्याने यंदा केंद्रीय मंत्रालयाकडून निर्देश दिल्यानंतरच हे पथक त्या विभागाची पाहणी करणार आहे. गुरुवारी या पथकाने पालिकेचे कागदोपत्री गृहपाठाची तपासणी केली. शुक्रवारपासून हे पथक शहरातील कोणत्याही भागाची अचानक पाहणी करणार आहे.

प्रारंभी ग्रामीण व शहरी भागातील स्वच्छतेबाबत उदासीन असलेल्या पालिकेने लांबणीवर पडणाऱ्या सर्वेक्षणाची फायदा घेऊन चांगल्या उपाययोजना केल्याची चर्चा आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहाटे पाच वाजल्यापासून स्वच्छतेचे धडे गिरवण्यास लावले जात आहेत. त्यामुळे स्वच्छता एके स्वच्छता हाच मंत्र जपला जात होता. गेल्या वर्षी माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक शिस्तीत पालिकेने स्वच्छता अभियान राबविले होते, मात्र यात ग्रामीण व झोपडपट्टी भागाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते होते. विद्यमान आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी कोणताही गाजावाजा न करता केलेल्या स्वच्छता उपाययोजना वाखणण्याजोग्या असल्याची चर्चा शहरात आहे. झोपडपट्टी भागातील शौचालयाची स्वत: पाहणी करणारे आयुक्त सातत्याने शहरभर भेटी देत असल्याने अक्षरश: आजारी पडले आहेत. अनेक मान्यवर आणि नवी मुंबईकर असलेल्या सनदी अधिकाऱ्यांनी पालिकेच्या या उपाययोजनांचे तर कौतुक केलेच, पण सर्वसामान्य नागरिकदेखील या चकाचक येलो सिटीमुळे सुखावून गेला आहे.

ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी हे शहर सुशिक्षितांचे शहर आहे, मात्र त्यांचा आतापर्यंत सहभाग दिसून येत नव्हता. आज डॉक्टर, वकील, अभियंता या अभियानात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेले सर्व घटकांनी स्वच्छतेचा वसा घेतला आहे, असे सांगितले. हे सातत्य टिकवण्याची सर्वाची जबाबदारी असून यंदा आपण देशात पहिला क्रमांक पटकावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी शहरातील ग्रामीण व झोपडपट्टी भागातील अस्वच्छतेबाबत यापूर्वी मी टीका केली होती, मात्र त्यानंतर पालिकेने केलेल्या उपाययोजना चांगल्या असून शहराने एक रंग धारण केल्याचे दृश्य आहे, या शब्दांत शहर स्वच्छतेचे कौतूक केले. ठाणे बेलापूर मार्गावरून प्रवास करताना परदेशात प्रवास करीत असल्याची जाणीव होते. ही स्वच्छता कायम राहावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शहराचे रुपडे बदललेले दिसत आहे. या सर्व अभियानात नागरिकांचा सहभागही तेवढाच दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वच्छ संदेश, पथनाटय़, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, विशेषत: रामनगर, दिघा या झोपडपट्टी भागातील स्वच्छता कौतुकास्पद आहे.

व्ही. के. जिंदाल, केंद्रीय सचिव, स्वच्छ भारत अभियान

साफसफाई कामगारांचे फलकांद्वारे करण्यात आलेले अभिनंदन वेगळी कल्पना वाटली. ऐरोली येथील माईण्ड स्पेस आयटी कंपनीत तयार करण्यात आलेले ओला व सुका कचऱ्यापासून खतनिर्मिती हे प्रकल्प उद्योजकही या उपक्रमात सामील झाल्याचे उदाहरण आहे.

मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव, नगरविकास विभाग, राज्य

प्रत्येक उद्यानात ओला आणि सुका कचऱ्यापासून निर्माण होणारे खत त्याच उद्यानात वापरण्याची कल्पना अतिशय कल्पक असून आतापर्यंत भेट दिलेल्या सोलापूर, औरंगाबाद आणि पनवेल पालिकांपेक्षा येथील स्वच्छता आणि कल्पकता सुंदर आहे.

अनिल कदम, आमदार, अध्यक्ष, अर्थसंकल्पीय अंदाज समिती, राज्य

राज्य पातळीवर काम केल्याने विविध शहरांना भेटी दिलेल्या आहेत, पण नवी मुंबई पालिकेने स्वच्छतेबाबत केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतर मिळणारे एक महिन्याचे मानधन हे शहर साफ करण्यासाठी कामगार व विभाग अधिकाऱ्यांना समर्पित केले आहे.

सुब्बाराव पाटील, माजी सचिव, राज्य महिला आयोग