10 December 2018

News Flash

स्वच्छतेसाठी पनवेल पालिकेकडून ‘अ‍ॅप आग्रह’

पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याने व हाताखालच्या कर्मचाऱ्यांमध्ये किती अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले याचीच चर्चा रंगत आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ स्पर्धेत वरचा क्रमांक गाठण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

वर्षअखेर असल्यामुळे आणि अपुरे मनुष्यबळ असतानाही पहिल्यांदाच स्वच्छ भारत सर्वेक्षणात क्रमांक मिळविण्यासाठी पनवेल महापालिका झटत आहे. अधिकाधिक नागरिकांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१७’चे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ठरवलेले लक्ष गाठण्यासाठी पालिकेच्या अधीक्षकांना कामावर जुंपले आहे. सध्या पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याने व हाताखालच्या कर्मचाऱ्यांमध्ये किती अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले याचीच चर्चा रंगत आहे. पनवेल शहरातील कचरा कुंडय़ांबाहेर पडत असताना याच तुडुंब भरलेल्या कचऱ्याचे फोटो शेअर करण्यासाठी तरी हा अ‍ॅप डाऊनलोड करा, असे बोलण्याची वेळ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.

पंधरा महिन्यांपूर्वी नगरपरिषदेत रूपांतर झालेल्या महापालिकेमध्ये सत्ताधारी व प्रशासन यांच्यात विस्तव जात नसल्याची चर्चा असली तरी ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०१८’मध्ये पनवेल पालिकेचा क्रमांक लागण्यासाठी पालिकेचे सर्व सदस्य व प्रशासन एकजुटीने झटताना दिसत आहेत. लोकसेवकांकडून दररोज किती अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले, किती गृहसंकुलांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले याचा तपशीलवार हिशेब स्वत: आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे घेत असल्याने अधिकाऱ्यांना हातची जबाबदारी सोडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामाला प्राधान्य द्यावे लागत आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा शब्द टाळता येत नसल्याने पालिकेचे अधिकारी गृहसंकुलांत जाऊन तेथील रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व व अ‍ॅप डाऊनलोड करण्याची माहिती देत आहेत.

अशाच पद्धतीने औद्योगिक कारखान्यांमधील कामगार व विद्यालयातील शिक्षकांना मोठय़ा प्रमाणात पालिकेने संपर्क साधले आहेत. विद्यालयातील पालकांना या मोहिमेत कसे समावून घेता येईल याचेही नियोजन पालिकेतील अधिकारी करत आहेत. ख्रिसमस सणाच्या सुट्टय़ांमुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांतील पालकांना अ‍ॅप डाऊनलोडच्या मोहिमेत सामील करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.

नववर्षांत सिडकोची पालिकेला कचरा भेट

जानेवारी महिन्याच्या शुभारंभापासून सिडको महामंडळाकडून कचरा व आरोग्य सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची सर्व प्रक्रिया सिडको मंडळाने पूर्ण केली आहे. सुमारे सव्वातीनशे ते साडेतीनशे टन कचरा दिवसाला तळोजा येथील नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामध्ये आणण्याची जबाबदारी चार दिवसांनी पनवेल पालिकेवर येऊन ठेपणार आहे. शहर ते क्षेपणभूमी अशा कचऱ्याच्या वाहतुकीसाठी प्रशासनाला महिन्याला सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांचा खर्च येतो. तसेच सफाई कामगारांच्या महिन्याला वेतनावर प्रशासनाचे सुमारे ६० लाख रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान २०१८चे काम अपूर्ण असताना पनवेल पालिकेकडे आरोग्य व कचरा या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदारी येणार असल्याने नववर्षांत सिडकोने स्वत:च्या डोक्यावरील काटेरी मुकुट पनवेल पालिकेच्या डोक्यावर ठेवून पालिका प्रशासनाला नववर्षांचे बक्षीस दिल्याचे बोलले जात आहे.

First Published on December 28, 2017 1:53 am

Web Title: cleanliness app panvel municipal corporation