कचराकुंडय़ा हटवल्या, तरी कचरा त्याच जागी

नवी मुंबई शहर स्वच्छ राहावे म्हणून रस्त्यांवरच्या कचराकुंडय़ा हटवण्यात आल्या असल्या, तरी हा उपाय पुरता फसल्याचे स्पष्ट होत आहे. कचराकुंडय़ा हटवल्या तरी तिथेच उघडय़ावर मोठय़ा प्रमाणात कचरा टाकला जात आहे.

नवी मुंबईने स्वच्छता मोहिमेत गतवर्षी राष्ट्रीय पातळीवर आठवा तर राज्य पातळीवर पहिला क्रमांक पटकावला होता. मात्र यंदाच्या सर्वेक्षणात त्यात घसरण झाली. या वर्षी स्पर्धा खूप मोठय़ा प्रमाणात असल्याचे कारण पुढे करण्यात आले, मात्र हे स्वच्छता सर्वेक्षण संपल्यानंतर पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. नागरिकांचा उत्साहही मावळला आहे.

मनपाने काही महिन्यांपूर्वी अचानक शहरातील कचराकुंडय़ा हटवण्याचा निर्णय घेतला. वास्तविक असाच एक निर्णय नागरिकांचे सहकार्य न मिळाल्याने आणि पालिकेच्या नियोजनातील अभावामुळे फसला होता. त्यामुळे पुन्हा लाखो रुपये खर्च करून नव्याने कचराकुंडय़ा घेण्यात आल्या. तरीही पालिकेने हा निर्णय घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने २७५ कचराकुंडय़ा हटवल्या. तसेच घंटागाडय़ा वेळेवर ठिकठिकाणी पोहोचतील याचीही काळजी घेतली. तरीही बहुतेक ठिकाणी खासकरून गावठाण विभागात हे गणित फसले. रहिवाशांनी ज्या ठिकाणी कचराकुंडय़ा होत्या तिथेच कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे.

कचराकुंडय़ा नाहीत आणि घंटागाडीच्या वेळांचाही मेळ बसत नाही, अशी स्थिती असल्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. त्यामुळे दरुगधी पसरली असून डासांचाही प्रादुर्भाव होत आहे. शहराचे विद्रूपीकरणही होत आहे.

प्रशासनाने जनजागृती करणे आणि रहिवाशांच्या कचऱ्यासंदर्भातील समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. केवळ सर्वेक्षणपुरते स्वच्छता ठेवण्यात आली तर स्वच्छता योजनेचा मूळ हेतूच नष्ट होईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.