शिरवणे, गोठिवलीत कचऱ्याचे ढीग

स्वच्छता अभियानात गतवर्षी राज्यात पहिल्या आलेल्या आणि यंदा देशात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी धडपडणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे ग्रामीण भागांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. याला शहराचे प्रथम नागरिक महापौर जयवंत सुतार यांचे शिरवणे आणि उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांचे गोठिवली गावही अपवाद नाही. अस्वच्छता, तुटके पदपथ, उघडी गटारे इत्यादी समस्या या दोन गावांनाही भेडसावत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी केवळ उपनगरांकडेच नव्हे, तर ग्रामीण भागांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील गावे शहरांच्या तुलनेत नेहमीच दुर्लक्षित राहिली आहेत. आपल्या शहराला स्वच्छतेत प्रथम क्रमांक मिळाला, तर अभिमान वाटेलच, पण गावेही स्वच्छ व सर्व सुविधांनी युक्त असावीत, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. सध्या पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळी सहापासून शहर स्वच्छतेची देखरेख करण्यासाठी कामावर तैनात होत आहेत. शहराचे कानेकोपरे चकाचक केले जात आहेत. मात्र गावांत नेमके उलटे चित्र आहे.

महापौर व उपमहापौरांच्या गावांमध्ये पदपथ खचलेले, तुटलेले आहेत, गटारे उघडी आहेत, गटारावरील झाकणे तुटलेली आहेत, काही ठिकाणी डेब्रिजचे ढिग साचले आहेत, रहिवाशांना फिरताना नाक मुठीत घ्यावे लागत आहे अशी खंत उपमहापौरांनी व्यक्त केली. पालिकेने नुकतीच शहरातील विविध सोसायटय़ा, शौचालये, संस्था, शाळा यांना स्वच्छतेबाबत पारितोषिके दिली. या कार्यक्रमात ‘आमचा गाव कुठे आहे?’ अशी विचारणा उपमहापौरांनी महापौरांना खासगीत केल्याचे आणि याविषयी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.

नवी मुंबई महापालिका हद्दीत येणारी बेलापूर, दिवाळेपासून दिघ्यापर्यंतची सर्वच गावे स्वच्छतेबरोबरच नागरी सुविधांपासून वंचित आहेत. पालिकेने शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर रंगरंगोटी केली आहे. दुभाजक रंगवले जात आहेत. याच गावांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

नवी मुंबईत सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षणासाठी साफसफाई, रंगरंगोटी सुरू आहे, मात्र उपमहापौर असूनही मला स्वत:च्याच गावात नाक मुठीत धरून फिरावे लागत आहे. आयुक्तांना वारंवार सांगितले आहे. ते भेट देणार असतील तर आदल्याच दिवशी सर्व चकाचक करून ठेवले जाते. पण नंतर जैसे थे होते. ऑक्टोबरमध्ये बांधलेल्या शौचालयाला स्वच्छ शौचालय पुरस्कार दिला आहे. जुन्या शौचालयांची स्थिती तपासणे गरजेचे आहे.

मंदाकिनी म्हात्रे, उपमहापौर, नवी मुंबई महापालिका

शहराचा स्वच्छतेत प्रथम क्रमांक यावा यासाठी आयुक्तांपासून सर्वचजण प्रयत्न करत आहेत. परंतु माझ्या गावासह मूळ गावे व झोपडपट्टीत अद्याप स्वच्छतेचा अभाव आहे. मी विविध गावांत पाहणी केली. आयुक्तांना माहिती दिली. क्लीनअप मार्शल नेमल्यावर अधिक फायदा होईल.

जयवंत सुतार, महापौर, नमुंमपा

गाव आणि शहर असा भेद कधीच केला नाही. गावांमध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु गावांची रचना शहरांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे सारखेपणा दिसत नाही. शहर सर्वाचेच आहे त्यामुळे सर्वानी ‘आपले शहर’ या भावनेतून स्वच्छतेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

रामास्वामी एन., आयुक्त, नमुंमपा