वसाहतींतील स्वच्छता सिडको थांबविणार

सिडको वसाहतींतील साफसफाई आणि कचरा हटवण्याची सेवा सिडको गुरुवार १५ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करणार आहे. त्यामुळे खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल या भागांतील दैनंदिन साफसफाई पालिकेला करावी लागणार आहे. अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतरही सिडको क्षेत्रातील साफसफाईची सेवा हस्तांतरीत करून घेण्यात पनवेल पालिका टाळाटाळ करत होती, मात्र सिडकोने १५ मार्च ही अखेरची मुदत दिली होती.

याआधी पनवेल पालिकनेही स्वच्छ सर्वेक्षणापर्यंत मुदत देण्याची विनंती सिडकोला केली होती. त्यावेळी १५ मार्च ही मुदत निश्चित करण्यात आली होती. ही सेवा हस्तांतरीत करून घेण्यासाठी पालिका प्रशासनाने सिडकोतील काही निवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडको आणि पनवेल पालिकेत साफसफाई हस्तांतरावरून गेले अनेक महिने वाद सुरू आहे. ही सेवा हस्तांतरित करून घ्यावी यासाठी सिडको प्रयत्नशील होती, तर ती तूर्त नको म्हणून पनवेल पालिका विविध सबबी देत होती. पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी तर यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गळ घातली होती. त्यांच्या आदेशाने सिडकोने दीड महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

साफसफाई हे पालिकेचे नागरी काम असल्याने आता ही सेवा हस्तांतरीत करून घ्यावी असा निर्वाणीचा इशारा सिडकोने दिला आहे. त्यानुसार १५ मार्च ही अंतिम मुदत आहे. ती गुरुवारी संपत असून त्याच दिवशी मध्यरात्रीपासून दक्षिण नवी मुंबईतील ही सेवा थांबवली जाणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले. त्यानंतर पनवेल पालिका सिडको क्षेत्राची साफसफाई करणार असून कचरा क्षेपणभूमीपर्यंत वाहून नेणार आहे. मात्र त्यानंतर या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया सिडको तळोजा येथे करणार आहे.

पनवेल पालिकेने ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी सिडकोच्या काही माजी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती मिळवण्यास सांगितले आहे. त्यानुसार सिडकोने त्यांना सर्व माहिती दिली असून आता ही सेवा हस्तांतरीत करून घेण्यास पालिका तयार असल्याचे दिसते. पालिकेने ही सेवा हस्तांतरीत करून न घेतल्यास पुन्हा या भागात कचऱ्याचे ढीग दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिडकोने १५ मार्च ही अंतिम मुदत निश्चित केली होती. त्याला पनवेल पालिका तयार झाली आहे. त्यामुळे परवापासून ही सेवा पालिका हस्तांतरीत करून घेईल अशी अपेक्षा आहे.

डॉ. बी. एस. बावस्कर, मुख्य आरोग्य अधिकारी, सिडको