नवी मुंबई पालिकेकडून प्रकाशन; घंटागाडय़ांत वाजवणार

स्वच्छता सर्वेक्षण २०१९साठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. प्रभागनिहाय स्वच्छता प्रसार, स्वच्छता पंधरावडा यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छता चळवळ अधिक व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी गीताचा उपयोग केला जाणार आहे.

गेल्या वर्षी स्वच्छता संदेश प्रसारासाठी विविध माध्यमे वापरण्यात आली. या वर्षी त्यामध्ये अधिक भर घालत ध्वनिचित्रफितीचाही प्रभावी वापर करण्यात येणार आहे. गीतकार धनश्री देसाई यांनी लिहिलेल्या व विवेक म्हामुनकर यांनी संगीतबद्ध केलेल्या रोहित शास्त्री यांच्या स्वरांनी सजलेल्या मराठी व हिंदीतील नवीन स्वच्छतागीताचे प्रकाशन नुकतेच महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. हे स्वच्छतागीत घंटागाडय़ांवर नियमित वाजविले जाणार आहे. एक मिनिट कालावधीचे हे गीत विविध सार्वजनिक कार्यक्रमांत आणि सिनेमागृहांतही वाजवले जाणार आहे. डायलर टोनसाठीही त्याचा वापर करण्यात येणार आहे. ही ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या मंडपांतही हे गीत वाजविण्यात येणार आहे.

मराठी स्वच्छता गीतात ‘नवी मुंबई, नवी मुंबई, नवी मुंबई स्वच्छ करू, स्वच्छ करू शहर आपले मिळून सारे, वसा घेऊ या हाती स्वच्छतेचा, आळस टाकुनी स्वच्छ होऊ, गल्लीबोळ स्वच्छ करू, चला मिळुनी सारे घडवू या, नवी मुंबई चमकवू या’ असे शब्द आहेत. हिंदीत ‘नवी मुंबई, नवी मुंबई, नवी मुंबई, स्वच्छ करें, स्वच्छ करें शहर को अपने मिलकर सारे, स्वच्छता का मंत्र फिर सब अपनाये, आलस को सब त्याग उठे, चप्पा चप्पा साफ करे, चलो मिलकर सब हम ये कदम उठाये, नवी मुंबई चमकाये’ असे शब्द आकर्षक सुरांत गुंफले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशातील सर्वोत्तम कामगिरीचा बहुमान मिळाल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये  स्वच्छतेचा संदेश नवी मुंबईकरांमध्ये व्यापक स्वरूपात प्रसारित व्हावा यासाठी संगीत या अत्यंत प्रभावी माध्यमाचा वापर करण्यात येत आहे. हे आशयगर्भ स्वच्छतागीत लोकप्रिय होईल, अशी आशा आहे.

– जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई