पनवेल महानगरपालिका आणि सिडकोत जबाबदारीची टोलवाटोलवी

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या पाश्र्वभूमीवर पनवेल पालिका विविध उपक्रम राबवत असताना पालिका आणि सिडकोच्या हद्दवादाचा फटका स्वच्छतेला बसल्याचे ठिकठिकाणी दिसत आहे. पालिकेने या सर्वेक्षणासाठी तयार केलेल्या अ‍ॅपवर सिडको वसाहतीतील रहिवाशांनी तक्रार केल्यास हा परिसर सिडको अंतर्गत येतो, सिडकोकडून कारवाई केली जाईल, असे कळवले जाते. मात्र प्रत्यक्षात पालिका आणि सिडकोपैकी कोणीही कचरा हटवत नसल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचू लागले आहेत.

खारघर सेक्टर ७ व १२ येथील सिडकोच्या ‘शहर स्वच्छ ठेवावे’ असे आवाहन करणाऱ्या फलकाखाली, पनवेल पालिकेच्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’च्या मोठय़ा फलकाजवळ कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. पदपथावर कचरा इतस्तत: पसरला असून तुटलेल्या-गंजलेल्या कचराकुंडय़ांनी पदपथ व्यापला आहे. सेक्टर १९ मध्येही पालिकेच्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या फलकासमोर रस्त्यावर डेब्रिज टाकण्यात आले आहे. त्यामुळे पदपथ जवळपास नाहीसा झाला आहे. कळंबोली, कामोठेतही हीच स्थिती आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

रहिवाशांनी अ‍ॅपच्या माध्यमातून पालिकेडे तक्रार केल्यास सिडको कारवाई करेल किंवा कारवाई केली जाईल असे उत्तर देण्यात येते, परंतु प्रत्यक्षात सिडको आणि पालिकेपैकी कोणीही करत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. हद्दीचा तिढा सुटलेला नसताना पालिका अ‍ॅपवर तक्रार करण्याचे आवाहन का करत आहे, असा तक्रारदारांचा प्रश्न आहे.

सिडको आणि पालिकेच्या हद्दवादात रहिवाशांना मात्र नाक मुठीत घेऊन राहावे लागत आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपवर खारघरमधील कचऱ्याची समस्या मांडण्यात आली होती, परंतु हा विभाग सिकडोअंतर्गत येतो. सिडकोला याबाबत माहिती देण्यात येईल, असे उत्तर दिले जात असून, कारवाई मात्र झालेलीच नाही.

– नेत्रा पाटील, नगरसेविका, खारघर

पालिकेकडून सिडकोला अ‍ॅप देण्यात आले होते, ते बंद आहे. कचऱ्याशी संबंधित माहिती दिली जात होती. तसेच पालिकेकडून कारवाईसंबंधी माहिती स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिली जाते आणि त्यानुसार कारवाई केली जाते.

– बी. एस. बावस्कर, आरोग्य अधिकारी, सिडको

स्वच्छता अ‍ॅपसाठी सिडकोच्या हद्दीतील कारवाईच्या दृष्टीने पनवेल पालिकेने सिडकोला इंजिनीअर अ‍ॅप घेण्यास सांगितले आहे. कारवाई करण्याची महिती त्या अ‍ॅपवर देण्यात येते व त्यानुसार कारवाई केली जाते.

– संध्या बावनकुळे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका