ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत १५ टक्के वाढ; साथीच्या आजारांचे प्रमाण कमी

नवी मुंबई आणि परिसरात गेल्या महिन्यापासून असलेल्या उष्ण-दमट हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये विषाणूजन्य तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. पालिका तसेच खासगी रुग्णालयांत ताप, सर्दी, खोकल्यावरील उपचारांसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तापाच्या रुग्णांत गेल्या महिन्याच्या तुलनेत १५ टक्के वाढ झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

ऊन-पाऊस असे संमिश्र हवामान विषाणूंच्या वाढीस पोषक असते. त्यामुळे साधारण पावसाळा संपत आला की विषाणूंत मोठय़ा प्रमाणात वाढ होते. हे विषाणू हवेतून पसरतात. त्यामुळे संसर्ग सहज आणि वेगाने होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पालिका तसेच खासगी रुग्णालयांत तापाने बेजार झालेल्या रुग्णांची रीघ लागत आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये तापाच्या रुग्णांचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे.

साथीच्या आजारांचे रुग्ण मात्र गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झाल्याचे पालिका रुग्णालयातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण सप्टेंबरमध्ये कमी झाले आहेत.

ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ५५ संशयित रुग्ण आढळले होते, त्यापैकी १ रुग्णाला डेंग्यूची लागण झाली होती, सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ६३ संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी एकालाही डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले नाही. तसेच ऑगस्टमध्ये २३ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत १२ रुग्ण मलेरियाग्रस्त आहेत. अतिसाराच्या रुग्णांत वाढ झाली असून ऑगस्टमध्ये ३ तर सप्टेंबरमध्ये १० रुग्ण आढळले आहेत. गॅस्ट्रो व विषमज्वर रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ऑगस्टमध्ये गॅस्ट्रोचे ७ रुग्ण आढळले, सप्टेंबरमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. ऑगस्टमध्ये विषमज्वराचे १० रुग्ण होते, तर सप्टेंबरमध्ये ६ रुग्णांची नोंद झाली आहे.

कल्याणमध्ये डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू

कल्याण-डोंबिवली शहरातही डेंग्यूच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या तीन महिन्यांत १९३ डेंग्यूचे संशयित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांपैकी नेमक्या किती रुग्णांना डेंग्यूची लागण झाली, याचे अहवाल अद्याप आरोग्य विभागाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे हा आकडा समजू शकलेला नाही. असे असले तरी शहरामध्ये ऑगस्ट महिन्यात डेंग्यूमुळे मात्र एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.   तसेच गेल्या तीन महिन्यात गॅस्ट्रोचे १५०, कावीळ १०५, तर टायफाईड २३७ रुग्ण आढळले असून  शहरात साथीच्या आजारही वाढत असल्याचे चित्र आहे.

ठाण्यात डेंग्यूची साथ

ठाण्यात चार महिन्यात महापालिका आणि खासगी रुग्णांमध्ये  डेंग्यूचे  चारशे संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ८९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तसेच चार महिन्यांत अतिसाराचे १०५७ आणि मलेरियाचे ४५३ रुग्ण शहरात आढळले आहेत तर स्वाईन फ्लूचे चार आणि चिकन गुनियाचा एक रुग्ण सापडला आहे.

पालिका रुग्णालयातील साथीच्या आजाराचे रुग्ण कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. हवामानातील बदलांमुळे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.

– डॉ. दयानंद कटके, वैद्यकीय अधिकारी, नमुंमपा

यंदा उष्ण दमट हवामानाने हवेतील जंतूंची प्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. परिणामी यंदा विषाणूजन्य तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

– डॉ. भरत जग्यासी, तेरणा रुग्णालय, नेरुळ