नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

उरणच्या विकासाला प्राधान्य देत कोकणातील सर्वोत्तम शहर बनवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. ते उरण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. नगरपालिकेत प्रथमच भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे.

[jwplayer izOWW4O7]

राज्यातील ५० टक्के लोकसंख्या शहरात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे खेडी ओस पडून झोपडपट्टय़ांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरीकरणाच्या समस्याही वाढल्या आहेत.  योग्य नियोजन करून बकाल शहरांचा विकास करण्याची संधी आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. केंद्रात व राज्यात सत्तेवर आणलेत, आता उरणचीही सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले.

रोजगाराच्या शोधात शहरात आलेल्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे शहरांना बकाल स्वरूप आले आहे. हे चित्र बदलण्याची संधी पंतप्रधानांनी स्मार्टसिटी योजनेतून दिली आहे. गेली अनेक वर्षे शहरांच्या विकास आराखडय़ांना मान्यता न देता झोन बदलीचे दुकान सुरू होते. यात आपण बदल केला आहे. त्यासाठी राज्यातील नगरपालिकेच्या विकास आराखडय़ांना मंजुरी देण्यात आली आहे. आजवर ७० विकास आराखडय़ांना मंजुरी दिली आहे. नगरपालिकांच्या विकासासाठी सुलभतेने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आराखडय़ानुसार दर्जेदार क्रीडांगणे, उद्याने, बाजारपेठा उभारता येणार आहेत. त्यासाठी १०० टक्के चटईक्षेत्र मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

राज्यातील औद्योगिक प्रदूषण हे केवळ १० टक्के आहे. शहरांचे जलसाठे प्रदूषित झाले आहेत. यावर उपाय म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री करणारे २१०० कोटींचे प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. यापुढे नगरपालिकांचा कारभार हा हायटेक करण्यात येणार आहे. आपल्या कामांसाठी नागरिकांना पालिकेत येऊन खिडक्या-टेबलांवर वेळ घालवावा लागणार नाही, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. या सभेत माजी खासदार रामशेठ ठाकूर व उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी यांनीही आपले विचार मांडले.

[jwplayer OnydZc5l]