मुख्यमंत्र्यांचे मनोगत, कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन

आधुनिक उपचारांसाठी सुसज्ज रुग्णालयासोबतच सेवाभाव महत्त्वाचा आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी अत्याधुनिक उपचार केंद्रे महाराष्ट्रात ठिकठिकाणी उभी राहणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील ‘महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट’च्या या रुग्णालयामधून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपचार केले जाणार आहेत. या रुग्णालयातून रोज एका मुलावर मोफत उपचार केले जाणार आहेत, ही महत्त्वाची बाब आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बुधवारी नवी मुंबई, सानपाडा येथे महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

‘आधुनिक कर्करोग रुग्णालय सुरू केले ही चांगली बाब आहे. या रुग्णालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि उपचारांसाठी केवळ ५० टक्के रक्कम द्यावी लागेल. कर्करोगावरील उपचार महागडे आहेत. लोकांना आर्थिक व शारीरिक त्रास मोठय़ा प्रमाणावर सहन करावा लागतो. म्हणून अशी केंद्रे अनेक ठिकाणी सुरू होणे आवश्यक आहे. येथे दररोज एका मुलाचा उपचार मोफत होणार आहे. ही खूप मोठी सेवा आहे,’ असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री रिलीफ फंडातून उपचारांसाठी मदत केली जाते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून विविध रोगांवर मोफत उपचार केले जात आहेत. यामुळे राज्यातील कोणताही माणूस उपचारांविना राहणार नाही. राज्य शासन अशा रुग्णालयांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास महापौर सुधाकर सोनावणे, खासदार राहुल शेवाळे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

३० मुलांवर मोफत उपचार

महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या या १२ मजली रुग्णालयात १०० रुग्णांना दाखल करण्याची सोय आहे. दरमहा ३० मुलांवर मोफत उपचार होणार आहेत. उपचारांसाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.