लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : टाळेबंदीत बंद असलेली ऐरोली सागरी जैवविविधता केंद्रातील बोट सफर १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली असून पर्यटक व अभ्यासक प्रतिसाद देत आहेत. ७० जणांनी या सफरीचा अनुभव घेतला असून यातून ३७ हजार ५०० रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

नवी मुंबई शहराला लाभलेला खाडी किनार आणि जैवविविधता याच्या माहितीसाठी ऐरोलीमध्ये सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी पक्षीप्रेमींना बोटीने खाडीसफर करता यावी यासाठी बोटसेवाही देण्यात आली आहे. नवी मुंबईसह, ठाणे, मुंबईतील पर्यावरणप्रेमी, पर्यटक मोठया संख्येन या केंद्राला भेट देत असतात व बोट सफरही करीत असतात. टाळेबंदीत ही सेवा बंद ठेवण्यात आली होती. १ नोव्हेंबरपासून ती सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बस वाहतुकीप्रमाणे करोनामुळे बोटीतून वाहतुकीसाठीही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. पन्नास टक्के वाहतूक करता येत आहे. २४ आसनी बोटिंग करिता १२ आसने तर ७ आसनी बोटिंगला ४ आसनापर्यंत मर्यादा ठेवली आहे. यामुळे दरही वाढविण्यात आले आहेत. २४ आसनी बोट सफरीसाठी ३९६ ते  ५२८ रुपये प्रतिआसन दर आकारले जात आहेत. तर ७ आसन बोटिंगमध्ये चार जणांच्या एका गटाला ६६०० ते ७९२० रुपये दर आकारले जात आहेत.

ऐरोली ते वाशी अशी बोटिंग सफर असून पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती वन विभाग अधिकारी एन.जे.कोकरे यांनी दिली आहे. मात्र ही बोटिंग सफर सुरू केली आहे. १ नोव्हेंबरपासून ते आतापर्यंत एकूण ७० जणांनी बोटिंग सफर केली आहे तर २९२ जणांनी केंद्रातील भेट दिली आहे. यातून ३७ हजार ५०० रुपये निधी जमा झाला आहे.