नवी मुंबई पालिकेचे नियोजन: ‘एचएफएनसी’ यंत्र खरेदीनंतर प्राणवायूची गरज चाळीस टक्क्यांनी कमी होणार

नवी मुंबई : प्राणवायूची नितांत गरज असलेल्या करोनाबाधित रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या एचएफएनसी (हाय प्लो नॉसल क्यॅनुला) यंत्राची पालिका खरेदी करणार आहे. या यंत्रामुळे प्राणवायूची गरज असलेल्या रुग्णाला हवेतील प्राणवायू संकलित करून तो यंत्रातील शुद्ध पाण्यावाटे देता येणार आहे. यामुळे अत्यवस्थ रुग्णांना लागणाऱ्या प्राणवायूची गरज चाळीस टक्क्याने कमी होणार आहे.

करोनाबाधित रुग्णाला दुसऱ्या टप्प्यात प्राणवायूची गरज भासत असल्याचे आढळून आले आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमीत कमी व्हावा यासाठी पालिकेने आरोग्य यंत्रणेत अनेक बदल करण्याचे ठरविले असून यासाठी काही निष्णांत डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या करोनाबाधित रुग्णाला काही गंभीर लक्षणे आढळून आल्यास सर्व प्रथम प्राणवायू पुरवठा केला जात आहे. त्यासाठी पालिकेने अतिरिक्त प्राणवायू रुग्णशय्या तयार ठेवल्या आहेत. आजच्या घडीला पाचशे प्राणवायू रुग्णशय्या जादा आहेत. त्यानंतर लागणाऱ्या कृत्रिम प्राणवायू पुरवठ्यासाठी वाशी येथील सिडको प्रर्दशन केंद्रात तयारी करण्यात आली असून सानपाडा येथे एमजीएम रुग्णालयात शंभर रुग्णशय्या तयार ठेवण्यात आलेल्या आहेत. या सर्व आरोग्य यंत्रणा उभारण्याचा प्रयत्ना करणाऱ्या पालिकेने आता बड्या खासगी रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या ‘एचएफएन’सी यंत्राचा समावेश केला आहे. या यंत्राद्वारे अत्यवस्थ रुग्णाला दोन नळकांड्यांनी हवेतील ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. या ऑक्सिजनची मात्रा इतर ऑक्सिजन पुरवठ्यापेक्षा जास्त राहणार आहे. शुद्ध पाण्याची छोटी प्लास्टिक टाकी असलेल्या पाण्यातून हे प्राणवायू रुग्णाला मिळणार आहे. त्यातील शुद्धता जास्त असल्याने रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत होणार असून रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता अधिक वाढणार आहे. हवेतील प्राणवायू खेचून रुग्णाला दिला जाणार असल्याने शरीराला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा होण्यास मदत मिळणार असल्याचा पालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे. वाशी येथील सिडको प्रर्दशन केंद्रात हे यंत्र बसविले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या हे यंत्र प्राणवायू यंत्रापेक्षा स्वस्त असून ते एका रुग्णापासून दुसरी कडे हलविणे शक्य आहे. त्यामुळे पालिकेने अशी यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढत्या रुग्णसंख्येला लागणारी सर्व वैद्यकीय यंत्रणा उभी करण्याचा पालिका प्रयत्न करीत आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठीही डी. वाय. पाटील रुग्णालयात रुग्णशय्या वाढविण्यात आलेल्या आहेत. याशिवाय वाशी येथील ‘ईएसआय’ रुग्णालय तयार केले जात आहे. प्राणवायूची आवश्यकता असलेल्या रुग्णांना ‘एचएफएनसी’ यंत्र विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे प्राणवायू (व्हेंटिलिटर) यंत्राची ४० टक्क्याने गरज कमी होणार आहे.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका