खारघरमध्ये लवकरच उभारणी

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली गेल्यानंतर खारघर, कळंबोली, नवीन पनवेल हा नवी मुंबईचा दक्षिण भाग पुणे, बंगळूरु आणि गुडगावखालोखाल वाणिज्यिक व्यापारांचे माहेरघर म्हणून उदयास येत आहे. खारघर येथे आठ कोटी चौरस फुटांवर वाणिज्य केंद्र उभारले जाणार असून हे संकुल वांद्रे-कुर्ला संकुलाच्या दुप्पट आकाराचे असणार आहे. या संकुलाचा आराखडा तयार करण्याचे काम मुंबईतील एका नामांकित कंपनीला देण्यात आले आहे.

नवी मुंबई व पनवेल पालिका क्षेत्र मिळून तयार झालेल्या नवी मुंबईचे सिडको क्षेत्र मात्र ३४४ चौरस किलोमीटर आहे. या क्षेत्रात पुढील वर्षी पहिल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा कार्यान्वित होणार आहे. पावसाळ्यातच नेरुळ-उरण रेल्वे खारकोपपर्यंत धावणार आहे. याच वेळी मेट्रो रेल्वेचे काम प्रगतिपथावर आहे. गोल्फ कोर्स व सेंट्रल पार्क सुरू आहेत. पनवेल रेल्वे स्थानकाला मिळणारा टर्मिनसचा दर्जा आणि नैना क्षेत्रामुळे वाढणारे नागरीकरण लक्षात घेता सिडको खारघर येथे पारसिक डोंगराच्या पायथ्याशी १२० हेक्टर जमिनीवर खारघर कार्पोरेट पार्क (केसीपी) उभारणार आहे. हे पार्क बीकेसीपेक्षा दुप्पट मोठे असणार आहे. जगातील अमेरिका, इंग्लड, नेदरलॅण्ड्स, सिंगापूर यांसारख्या २४ देशांतील वास्तुविशारदांनी या पार्कची संरचना तयार करून सिडकोकडे पाठविली होती. त्यातील सात वास्तुविशारदांच्या रचना स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका वास्तुविशारदाच्या रचनेची निवड करण्यात आली आहे. सिडको या संरचनेवर काम करणार आहे. मुंबईतील इडिफाइस कन्सल्टंट कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या संरचनेनुसार या कॉर्पोरेट पार्कचे येत्या काळात काम सुरू केले जाणार आहे. येत्या पाच वर्षांत सिडको क्षेत्रात आठ कोटी चौरस फूट वाणिज्यिक क्षेत्रफळ विक्रीसाठी निर्माण होणार आहे, असे जेएलएल इंडिया सल्लागार कंपनीने सांगितले.

मुंबईत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि वित्तपुरवठा कंपन्यांनी नवी मुंबईकडे मोर्चा वळविला आहे. एका सर्वेक्षणानुसार नवी मुंबईत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ७० कंपन्या असून सिडकोने वाशी व बेलापूर रेल्वे स्थानकांच्या परिसरातील वाणिज्य क्षेत्र आयटी कंपन्यासाठी खुले केले आहे. खारघर येथे केसीपी पार्क सुरू झाल्यानंतर आठ कोटी चौरस फूट क्षेत्र हे केवळ वाणिज्य व्यवहारांसाठी असणार आहे. रिलायन्सच्या दोन्ही समूहांची कॉर्पोरेट कार्यालये यापूर्वीच नवी मुंबईतील कोपरखैरणे व घणसोली भागात सुरू झाली आहेत.