नवी मुंबई पालिकेचा निर्णय; अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती

नवी मुंबई : खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांवर अवाजवी देयके थोपविण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णांच्या कुटुंबीयांना अवास्तव देयकांना सामोरे जावे लागू नये, यासाठी नवी मुंबई पालिकेने अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून देयकांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अवास्तव देयके दिली जात आहेत. यावरून काही राजकीय आणि सामाजिक संघटनांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे पाालिकेच्या वतीने समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टाळेबंदीत अनेक व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांचा हातचा रोजगार गेला आहे. अनेकांना वेतनकपातीला सामोरे जावे लागले आहे. त्यात खासगी रुग्णालयांनी रुग्णांची आर्थिक लूट करण्यास सुरुवात केली आहे. या साऱ्यांचे अनेकांवर मानसिक दडपण येत आहे. काहींनी या लुटीविरोधात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयांत दूरध्वनीवरून तक्रारी केल्या आहेत.

राज्य रुग्णांवरील उपचार आणि खाटांच्या दराबाबत दर निश्चित केले आहेत. त्यात साधारण खाटा, अतिदक्षता विभाग, जीवरक्षक प्रणाली इत्यादीचा समावेश आहे. मात्र, खासगी रुग्णालये या नियमांना बगल देत लाखांची देयके देत आहेत. खासगी रुग्णालयाद्वारे अवास्तव बिले आकारली जात आहेत. वारंवार याबाबत पालिकेकडे तक्रार केली आहे. खासगी रुग्णालयांनी दरपत्रक निश्चित करून लावावे. हवी तेवढी बिले आकारल्याने नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी गजानन काळे यांनी केला आहे.

नवी मुंबई महापालिकेत खासगी रुग्णालयांच्या देयकांबाबत तक्रारी येत असल्याने पालिकेतील अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची  नेमणूक करून समिती तयार करण्यात येईल. याशिवाय अवाजवी देयके आकारणाऱ्या रुग्णालयांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त