कॉ. बी. टी. रणदिवे स्मारक ग्रंथालय, आग्रोळी

नवी मुंबईतील आग्रोळी गावात १९६१ पासून ‘एक गाव एक गणपती’ प्रथेची मुहूर्तमेढ रोवणारे, कम्युनिस्ट विचारसरणीचे कॉम्रेड भाऊ  पाटील यांनी १९७२ ला आठ गुंठे जागा विकत घेतली. या जागेवर १९८० मध्ये ए. के. गोपालन भवन बांधण्यात आले. १९९४ ला याच गोपालन भवनात बी. टी. रणदिवे स्मारक ग्रंथालय सुरू करण्यात आले. तेव्हापासून आजवर या वास्तूने या गावात आणि परिसरात वाचनसंस्कृती रुजवली, जोपासली आहे. सामाजिक बांधिलकी जपणारी एक पिढी या ग्रंथालयाने घडवली आहे.

पुस्तके सामान्य माणसाचे विचार घडवू शकतात, या विश्वासातून १९९४ ला गोपालन भवनात बी. टी. रणदिवे स्मृती ट्रस्टचे बी. टी. रणदिवे स्मारक ग्रंथालय सुरू करण्यात आले. सुरुवातीला गावोगावी जाऊन पुस्तके आणण्यात आली. ग्रंथालयाचे उद्घाटन कवी नारायण सुर्वे, नाटककार वामन केंद्रे, रावसाहेब कसबे, अर्जुन डांगळे, प्रभाकर संझगिरी, कृष्णा खोपकर व कॉ. भाऊ  पाटील यांच्या उपस्थितीत झाले. सुरुवातीला ३५० सभासद होते. सर्वानी आपापल्या घरची पुस्तके आणून दिली. त्यावेळी २५०० पुस्तके होती. त्याच वेळी शासनाचे अनुदान मिळाले. सुरुवातीला ५ रुपये प्रवेश शुल्क आणि १०० रुपये अनामत रक्कम होती. १० रुपये वर्गणी होती. १९९४ ला तुळशीदास पवार ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक वर्ष ग्रंथालयाचा कारभार सांभाळला. बी. टी. रणदिवे स्मृती ट्रस्ट हे आग्रोळी गावातील समाजवादी विचारांचे, प्रबोधनाचे केंद्र  झाले.

याच स्मृती ट्रस्टमध्ये कामगार संघटना, आंबेडकरवादी संघटना व चळवळींचे विविध कार्यक्रम झाले आणि आजही सुरू आहेत. निबंध स्पर्धा, कवी संमेलने आयोजित केली जातात. राष्ट्रीय सण-उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरे केले जातात. याच ग्रंथालय वास्तूत सुभाष थोरात, नारायण सुर्वे, अर्जुन डांगळे यांचे कार्यक्रम, शाहिरी शिबिरे, लोककला प्रबोधन असे विविध कार्यक्रम सातत्याने होत. अमर शेख कलापथकाचे विविध कार्यक्रम येथे झाले. सामाजिक बांधिलकी जपणारी पिढी घडवण्याचे काम ग्रंथालयाने केले. याच संस्थेच्या सभागृहात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यव्यापी शिबिरांसह विविध कार्यक्रम होतात. ग्रंथालयाला अ दर्जा असून दोन लाख ८८ हजार रुपये शासकीय अनुदान मिळते. ग्रंथालयात सध्या ४२ हजार पुस्तके आहेत. सध्या संस्थेचे ६५० सभासद असून ५५ आजीव सभासद आहेत. ग्रंथालयात चार कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रंथालय सकाळी ९ ते दुपारी २ व संध्याकाळी ४ ते ७.३० दरम्यान सुरू असते.

कॉ. भाऊ  पाटील यांच्यानंतर संस्थेचे अध्यक्षपद नामदेव भाऊ  पाटील यांनी सांभाळले आहे. व्यवस्थापक व खजिनदार म्हणून कमलाकर भोईर कारभार सांभाळतात. राजेश पाटील, श्याम पाटील, दिलीप वैद्य, दिलीप पाटील, किशोर साळवे हे कार्यकारिणी सदस्य आहेत. भाऊ  पाटलांचा वाचनसंस्कृतीचा वसा अविरतपणे पुढे नेण्यासाठी हे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

आज नवी मुंबई एक आधुनिक शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पण हे ग्रंथालय स्थापन झाले तेव्हा परिस्थिती वेगळी होती. शहरात कौलारू घरे होती. आगरी-कोळी बांधवांची वस्ती होती. आजुबाजूची गावे एकत्र करून महापालिकेची स्थापना करण्यात आली. मात्र आजुबाजूच्या ठाणे, मुंबई महापालिका क्षेत्रांप्रमाणे साहित्य, संस्कृतीचे जतन करणाऱ्या संस्था तेव्हा नवी मुंबईत नव्हत्या. विकासाच्या या टप्प्यात शहराची साहित्यिक, वैचारिक गरज भागविण्याचे, नागरिकांतील अभिरूची वृद्धिंगत करण्याचे कार्य करणाऱ्या संस्थांत आग्रोळीतील कॉ.  रणदिवे स्मारक ग्रंथालयाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

आज नवी मुंबईत सर्वत्र टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. सर्व पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. काळाच्या ओघात अनेक ग्रंथालये, वाचनालये, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. मात्र या सर्व संस्थांच्या गर्दीतही शहरवासीयांच्या विचारांना सुरुवातीच्या काळात आकार देणाऱ्या या ग्रंथालयाचे मानाचे स्थान अबाधित आहे.

दातृत्वाचा वसा

नवी मुंबईतील जागांना आज कोटय़वधींचे भाव आहेत. परंतु ज्या समाजाच्या कुशीत आपण वाढलो, घडलो त्या समाजाचे आपण काही देणं लागतो, या भावनेतून कॉ. भाऊ पाटील यांनी आग्रोळी गावातील स्वत:ची दोन गुंठे जागा संस्थेला देणगी दिली आहे. त्याच ठिकाणी संस्थेच्या वतीने व आर. आर. फाऊंडेशन कलकत्ता यांच्या मदतीतून अभ्यास केंद्र व अतिथीगृह उभारण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून हजारो तरुणांनी याच ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून प्रगती केली आहे.

संतोष जाधव santoshnjadhav7@gmail.com