24 April 2019

News Flash

अंजिराचा दिवाळी बहार यंदा नाही

पावसाअभावी फळधारणाच नाही

पावसाअभावी फळधारणाच नाही

कमी पावसाचा अंजीर बागांना मोठा फटका बसला आहे. ६० ते ७० टक्के बागांना फळधारणाच झाली नसल्याने या वर्षी अंजीराचा दिवाळी बहार शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. त्याचा परिणाम बाजारातही दिसून येत आहे. एपीएमसीच्या फळ बाजारात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्याच आठवडय़ात १४ क्विंटल अंजीर आले होते. यंदा मात्र एकच गाडी आली आहे.

सध्या सफरचंद, डाळिंब आणि सीताफळ या फळांचा हंगाम सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये वेध लागतात ते अंजीराचे. मात्र कमी पावसाचा या बागांना मोठा फटका बसला आहे. अंजीरासाठी प्रसिद्ध पुरंदर तालुक्यातील दिवाळी बहार मोठय़ा प्रमाणात एपीएमसीच्या फळबजारात येतो. याबाबत पुरंदर तालुक्यातील अंजीर उत्पादक शेतकरी नारायण जाधव यांनी या वर्षी पावसाअभावी फळधारणा झालीच नसल्याचे सांगितले. दरवर्षी दिवाळी बहारात ६० ते ७० टक्के बागा धरल्या जातात, या वर्षी  १० ते २० टक्केच बागा धरल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे ७५ टक्के नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांचे अर्थचक्र हे यावरच अवलंबून असते.

नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत अंजीरचा हंगाम असतो. १० नोव्हेंबरनंतर अंजीरची आवक वाढण्यास सुरुवात होईल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. सध्या बाजारात एक गाडी दाखल होत असून ४० नगाला २०० ते ३०० रु. बाजारभाव आहे.

नोव्हेंबर महिन्यात अंजीरच्या हंगामाला सुरुवात होते. परंतु तुरळक पावसामुळे फळ परिपक्व होण्यास उशिरा सुरुवात झाली आहे. म्हणून बाजारात सध्या अल्प प्रमाणात अंजीरची आवक झाली आहे.  संजय पिंपळे, घाऊ क व्यापारी, एपीएमसी फळ बाजार

 

First Published on November 2, 2018 1:37 am

Web Title: common fig fruit water scarcity