तीस रुपयांचा टोल चुकवून पळून जाणाऱ्या व त्याबाबत जाब विचारल्यानंतर टोल कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाहनचालकाला दोन मुलांसह तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
पळस्पे फाटा ते जेएनपीटी या महामार्गावर करंजाडे हा टोलनाका आहे. खोपोली येथील गगनगिरी महाराजांच्या मठातून दर्शन घेऊन कामोठे येथे परतत असताना चंद्रकांत शिंदे यांची इंडीका कार (एमएच. ४६, डी. ०८४१) टोल न भरता पुढे निघून गेली. या टोलनाक्यावर काम करणाऱ्या कैलास आंग्रे या कर्मचाऱ्याने या गाडीला रोखले असता उभय गटांत बाचाबाची झाली. संतापलेल्या शिंदे यांनी गाडीतील स्क्रू ड्रायव्हरने आंग्रे याच्यावर हल्ला केला. यात सुदैवाने आंग्रे याचा डोळा वाचला. प्रत्त्युत्तरादाखल टोलनाक्यावरील इतर कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्या शुभम व श्रीनिवास या मुलांना मारहाण केली.
पोलिसांनी या प्रकरणी कैलास आंग्रे व टोल कंपनीच्या इतर तीन कर्मचाऱ्यांविरोधात तसेच शिंदे व त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. शिंदे व त्यांच्या मुलांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. शिंदे यांचा टूरिस्टचा व्यवसाय असून त्यांची मुले महाविद्यालयात शिकत आहेत. जखमी कैलास आंग्रेवर वाशीतील फॉर्टिज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.