पोलीस ठाण्यात चांगली वागणूक मिळणार
सामान्य नागरिकांच्या मनातील पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केलेल्या पोलीसमित्र घोषणेच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनीही या दिशेने सकारात्मक पावले टाकली आहेत. याचाच एक भाग म्हणून खारघर पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांसाठी पिण्याचे पाणी देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबईतील पोलीस ठाण्यांत अभ्यागतांसाठी एक अभिप्राय पेटी ठेवण्यात आली असून त्यात पोलीस ठाण्यात आलेले अनुभव, सूचना, तक्रारी नोंदवण्याची सोय करण्यात आली आहे. या पेटीतील अभिप्राय पोलीस उपायुक्त हे महिन्यातून एकदा वाचणार आहेत.
महासंचालकांच्या संकल्पनेतील पोलीसमित्र हा या योजनेमध्ये मुख्य दुवा ठरणार आहे. संबंधित पोलीसमित्राला हे काम करण्यासाठी काही प्रमाणात वेतन देता येईल का, याचाही विचार सुरू आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांनी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटायचे व रखडलेले काम लवकर कसे होईल, याचे मार्गदर्शन हा पोलीसमित्र करणार असल्याचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यांमध्ये वाईट वागणूक मिळाल्यास सामान्य नागरिक पोलीस उपायुक्त पांढरे यांच्या ९९२३४५६५६५ या क्रमांकावर थेट संपर्कही साधू शकतील.