मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे रुळांलगत भाजी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे दिसून येत असून सानपाडा-नेरुळ रेल्वे रुळांदरम्यान भाजी पिकणाऱ्या भाजीचे गुरुवारी प्रदूषण नियामक मंडळ आणि अन्न औषध प्रशासनाने नमुने घेतले आहेत. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. निकृष्ट माती आणि सांडपाण्यावर पिकविण्यात येणाऱ्या या भाजीमध्ये विविध रसायने, विषारी वायू, दरुगधीयुक्त पाणी, शरीरास अपायकारक नायट्रोजन, शिसे, फॉस्फरस यांची मात्रा आढळून येत असल्याची तक्रार आहे. नवी मुंबई भाजपने या भाजी तपासणी अभियान सुरू केले आहे. रेल्वे रुळांलगत अतिक्रमण होऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मागील काही वर्षांपासून ही जागा रेल्वे सेवेतून निवृत्त होणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना भाडेपट्टय़ावर देण्यास सुरुवात केली आहे. मोठय़ा वशिल्याने पदरात पाडून घेण्यात येणारी ही विस्तीर्ण जागा हे कर्मचारी नंतर दुसऱ्यांना भाडेपट्टय़ावर देऊन मोकळे होत असल्याचे दिसून येते. रेल्वे रुळांलगत असलेल्या या जागेच्या दुतर्फा अलीकडे मोठय़ा प्रमाणात मेथी, मुळा, पालक या पालेभाज्यांचे पीक घेतले जात असल्याचे आढळून येते. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करताना नवी मुंबईत तरी निदान झोपडय़ाऐवजी हिरवीगार भाजी दिसून येते. ही भाजी जवळच्या सांडपाण्यावर तसेच मलनि:सारण पाण्यावर वाढवली जात असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते, मात्र तरीही ही भाजी मोठय़ा जोमाने तयार होत असून बाजारात हातोहात विकली जात आहे. याविरोधात आता नवी मुंबई भाजपचे सरचिटणीस संतोष पाचलग यांनी दंड थोपटले आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस, प्रदूषण नियंत्रण व अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन सानपाडा-नेरुळदरम्यान पदयात्रा काढली. त्यात प्रत्येक मळ्यातील भाजीचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.