दहा दिवसांत अहवाल देण्याचे आयुक्तांचे आदेश

नवी मुंबई :  पालिकेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याने नेमलेल्या दोन ठेकेदारांनी उद्यानांची देखभाल न करताच त्यांना देयके अदा केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यगमुळे पालिका प्रशासनाने याबाबत समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे. दहा दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना समितीला दिल्या असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन  पालिका आयुक्तांनी दिले आहे.

नवी मुंबईत परिमंडळ १ व परिमंडल २  मध्ये २८० उद्याने पालिकेने उभारली आहेत. आतापर्यंत या अद्यानांची देखभाल स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांकडून करण्यात येत होती. परंतु यात पैशांचा अपव्यय होत असल्याने पालिका प्रशासनाने ही सर्व कामे दोन ठेकेदारांना दिली आहेत. १ मेपासून ‘वंडर्स पार्क’ वगळता इतर उद्यानांचे माळी काम, विद्युतपुरवठा, सुरक्षा, स्थापत्य ही कामे हे ठेकेदार करीत आहेत. वर्षांला ३४ कोटी रुपये देखभाल दुरुस्तीवर खर्च केला जाणार आहे. तीन महिन्यांनंतर ठेकेदारांना देयके दिली जात आहेत. पहिले देयक ८ कोटी १० लाखांचे देण्यात आले आहे. पाच वर्षांसाठी हे काम त्यांना देण्यात आले आहे.

करोनाकाळात उद्याने बंद होती. अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. सुरक्षा व्यवस्था नाही. असे असतानाही पालिकेने ठेकेदाराला देयेक दिले असून यात गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी याची चौकशी करण्याची मागणी लावून धरल्यानंतर पालिका प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे.

दहा दिवसांत याबाबतचा अहवाल देण्यास पालिका आयुक्तांनी सांगितले आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी आश्वासन दिले आहे.

शहरातील विभागवार उद्याने

* बेलापूर : ६४

* नेरुळ : ५३

* वाशी : ४८

* तुर्भे सानपाडा : २५

* कोपरखैरणे : ३१

* घणसोली : १२

* ऐरोली, दिघा : ४४

उद्यानांच्या देखभालीच्या ठेक्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी तक्रार केली आहे. याबाबत चौकशी समिती गठित करून १० दिवसात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  दोषींवर कारवाई करण्यात येईल.

-अभिजीत बांगर, आयमुक्त, महापालिका