शांतीसागर अपार्टमेंट, वाशी सेक्टर- १०

वाशीतील शांतीसागर संकुलात वृद्धांची संख्या जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांना मायेची ऊब देऊन त्यांच्या मनात घर करणाऱ्या येथील रहिवाशांनी सेवासंस्कृती जपली आहे. त्यामुळे एकटेपणा वा एकाकीपणाची भावना ज्येष्ठांच्या मनात येत नाही.

१९९४ साली वाशी सेक्टर- १० मध्ये उभारलेल्या शांतीसागर संकुलात एकूण १२८ कुटुंबे आहेत. मात्र यापैकी ११३ कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. यातील बहुतेकांची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी स्थायिक झाली आहेत. तरीही या संकुलात ज्येष्ठ नागरिक एकटे पडलेले नाहीत. आयुष्याच्या सायंकाळी कोणीतरी आधार देणारे घराशेजारी आहे, हा विश्वास अनेकांना आनंदी जीवन जगण्यासाठीची नवी उमेद पुरवत आहे. वृद्धांसाठी एक सभागृह बांधण्यात आले आहे. रोज सायंकाळी छोटय़ाशा सभागृहात सर्व जण एकत्र येतात आणि त्यांचे एकमेकांशी हितगुज चालते. सभागृहात जमणाऱ्या प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्टय़ आहे. ते जपण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केले जाते. सर्व जण उत्सवी आहेत. वर्षभराचे सण-समारंभ साजरे केले जातातच, परंतु प्रत्येकाचा वाढदिवसही मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यातील प्रत्येकाचा आनंद अवर्णनीय असतो. एकटेपणा हरवून सर्वामध्ये मिसळण्याची संधी साधून प्रत्येक जण नवनव्या कल्पना लढवत असतो.

यालाच त्यांनी सर्वसमावेशक दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. महिन्याचा एक दिवस संकुलातील ज्येष्ठ आणि तरुण, याशिवाय लहान मुले आणि महिला एकत्र येतात. यात ज्येष्ठांचे कोडकौतुक केले जातेच, पण त्यांना धीर दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांचा ‘उमंग’ नावाने संघ तयार केला जातो. या माध्यमातून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. याशिवाय आरोग्य शिबिरेही घेतली जातात.

संकुलात दरवर्षी वेगवेगळ्या जातींच्या वृक्षरोपांची लागवड केली जाते. यात फळे आणि फुलांच्या झाडांची संख्या अधिक आहे. संकुलात सर्वाधिक उत्पन्न नारळाचे येते. संकुलातील सर्वाना त्याचे वाटप केले जाते. या ठिकाणी दोन उद्याने आहेत. एक मुलांच्या मनोरंजनासाठी आणि दुसरे ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी आहे. संकुलात सायंकाळी भजनाचे कार्यक्रम होतात.

‘डिजिटल ज्येष्ठ’

ज्येष्ठ नागरिकांना नेट बँकिंग,  ई-बिल, ऑनलाइन कामाची पद्धत आत्मसात करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो. यासाठी प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. संकुलाचे एक विशेष खाते तयार करण्यात आले आहे. त्यातून ज्येष्ठांना वीज, गॅस बिल भरण्याची सोय संकुलातच करण्यात येणार आहे. संकुलात छोटेसे वाचनालय सुरू करण्याचा  रहिवाशांचा मानस आहे.