पालिकेच्या माहिती फलकांवर सोय; खाटांविषयी संपूर्ण माहिती एका ‘क्लिक’वर

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात करोना रुग्णांना खाटाच मिळत नसल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात येत होत्या. नागरिकांना कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती मिळत नसल्याने रुग्णांची मात्र फरफट होत होती. पालिकेच्या  माहिती फलकांवर (डॅशबोर्ड) फक्त शहरातील एकूण खाटा आणि शिल्लक खाटांची संख्याच पाहायला मिळत होती. आता काही दिवसांतच पालिकेच्या माहिती फलकांवर  शहरातील खाटांविषयीची संपूर्ण माहिती मिळण्याची सोय करण्यात आली आहे.

पालिका आणि खासगी रुग्णालयांमधील खाटांबाबत पूर्ण माहिती पालिकेच्यावतीने समोर येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तर विविध लोकप्रतिनिधींनी शहरात खाटाच उपलब्ध नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पालिकेच्या माहिती फलकांवर सर्वच रुग्णालयांमधील रुग्णांसाठीच्या खाटांची माहिती फलकांवर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर शहरातील खाटांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरीकांना कोणत्या रुग्णालयात कोणत्या प्रकारच्या किती खाटा उपलब्ध आहेत.अतिदक्षता विभागातील खाटा, कृत्रिम श्वसन यंत्रणा कुठे आणि किती आहेत, अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

शहरात एकूण सर्व प्रकारचे मिळून ४२३४ खाटा आहेत.तसेच शहरात करोना रुग्णांच्या उपचारासाठी करोना काळजी केंद्र,तसेच डीसीएचसी आणि डीसीएच असे रुग्णांचे तीन भागांत विभागणी केली आहे. तसेच काही खासगी रुग्णालयांच्या खाटाही ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे शहरात सध्या करोनासाठीच्या खाटांची एकूण संख्या ४२३४ झाली असून पालिकेच्यावतीने निर्यातभवन व तुर्भे येथील राधास्वामी सत्संगभवन येथेही १ हजार ऑक्सीजन खाटा निर्माण करण्यात येणार आहे.

या नव्याने बदल करण्यात येत असलेल्या पालिकेच्या डॅशबोर्डवर  करोना रुग्णासाठीच्या एकूण खाटा,रुग्ण असलेल्या खाटा,शिल्क खाटा,कोणत्या रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत किती टक्के खाटा रुग्णालयांसाठछी उपलब्ध आहेत याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.