पालिका, एमआयडीसीचा पुढाकार ; दोन वर्षांचा कालावधी
नवी मुंबई : ‘एमआयडीसी’ने औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्त करण्यास नकार दिल्याने नवी मुंबई पालिकेने सुमारे ४०० कोटी रुपये खर्च करून काही प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. त्यानंतर आता अंतर्गत रस्त्यांची पावसाळ्यात होणारी दुरवस्था लक्षात घेऊन एमआयडीसी व पालिका ३० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करणार आहे. त्यासाठी १८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पालिका यातील १५ किलोमीटर रस्त्यांचे काम करणार आहे.
नवी मुंबई पालिका आणि टीटीसी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक यांचा वाद गेली २५ वर्षे न्यायालयात सुरू आहे. पालिकेला उद्योजकांकडून कर घेण्याचा अधिकार नाही, असा दावा औद्योगिक संघटनांनी केला होता. त्यामुळे पालिका ‘एमआयडीसी’तील नागरी सुविधा देताना हात आखाडता घेत होती. पावसाळ्यात ‘एमआयडीसी’तील सर्व रस्ते शरपंजीर पडल्याने उद्योजकांच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. पालिका ‘एमआयडीसी’तून मालमत्ता व जीएसटी (पूर्वी उपकर) वसुल करीत असल्याने नागरी सेवा सुविद्या देण्याची जबाबदारी पालिकेचीही आहे असा दावा करून ‘एमआयडीसी’ने प्रमुख व अंर्तगत रस्ते दुरुस्त करण्यास नकार दिला. त्यामुळे पालिकेने पाच वर्षांपूर्वी दिघा ते महापे व महापे ते तुर्भे हा एमआयडीसीतील प्रमुख रस्तांचे काँक्रीटीकरण पूर्ण केले आहे. यावर पालिकेने चारशे कोटी रुपये खर्च केले आहेत. या प्रमुख रस्त्यांशिवाय काही अंर्तगत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कंटनेर व डंपरच्या वाहतुकीमुळे हे रस्ते दिवसेंदिवस अधिकच खराब होत आहेत. त्यामुळे यातील काही मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय पालिका व एमआयडीसीच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
१८० कोटी रुपये खर्च
तीस किलोमीटर अंतराचे रस्ते पहिल्यांदा काँक्रीट केले जाणार असून यात पालिका अर्धे रस्ते करणार आहे. यावर सुमारे १८० कोटी रुपये खर्च होणार असून दोन कंत्राटदारांना हे काम विभागून देण्यात आले आहे. हे रस्ते येत्या दोन वर्षांत बांधून पूर्ण होणार असून उद्योजकांची काही अंशी निकृष्ट रस्त्यामधून सुटका होणार आहे. कोपरखैरणे, खैरणे, शिरवणे येथील एमआयडीसीत ही रस्त्यांची कामे होणार आहेत.
पालिकेने उद्योजकांची व्यथा लक्षात घेऊन एमआयडीसीतील अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केलेले आहे. येत्या अंदाज पत्रकात यासाठी वेगळी तरतूद केली असून तीस किलोमीटर अंतरापैकी अर्धे अंतराचा रस्ता पालिका बांधणार आहे. यावर १८० कोटी खर्च होणार आहेत.
सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 12:17 am