पालिकेकडून अग्निसुरक्षा तपासणीसह संरचनात्मक लेखापरीक्षण

नवी मुंबई : नाशिक येथील रुग्णालयातील प्राणवायू गळती व विरार येथील रुग्णालयातील आग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षा, प्राणवायू पुरवठा यंत्रणा तपासणीसह संरचनात्मक लेखापरीक्षण केले. यात शहरातील रुग्णालयांची स्थिती बरी असल्याचे समोर आले आहे. प्राणवायू पुरवठ्यात ६५ टक्के रुग्णालये ही सक्षम असून ४० पैकी ३१ रुग्णालयांची अग्निसुरक्षाही चांगली असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

महापलिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील सर्व रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा, प्राणवायू पुरवठा यंत्रणा व संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रुग्णालयांची झाडाझडती घेण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात एकूण ५१ रुग्णालयांत करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अग्निशमन यंत्रणा तपासणीत आतापर्यंत ४० रुग्णालयांचे परीक्षण करण्यात आले आहे. यात ३१ रुग्णालयांची अग्निसुरक्षा चांगली आहे. उर्वरित रुग्णालयात काही लहान त्रुटी आढळल्या आहेत. मात्र त्या तात्काळ देऊ करण्याचे संदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन प्रमुख शिरीष आरदवाड यांनी दिली. तर इमारत संरचनात्मक लेखापरीक्षणात सर्व इमारती सुस्थितीत असल्याचे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले. प्राणवायू पुरवठा यंत्रणेमध्ये ६५ टक्के रुग्णालयांत यंत्रणा परिपूर्ण आहेत. काही रुग्णालयात ज्या त्रुटी आढळ्या आहेत, त्या रुग्णालयांना सूचना-नोटीस पाठविण्यात आल्या असून तत्काळ सोडविण्यास सांगितले आह.

शहरातील ५१ रुग्णालयांतील प्राणवायू यंत्रणा तपासणी करण्यात आली असून यामध्ये ६५ टक्के रुग्णालयांत पूर्ण क्षमतेने व्यवस्था आहे. उर्वरित रुग्णालयांत आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर सूचना नोटीस देण्यात आली आहे. -बाबासाहेब राजळे, उपआयुक्त घनकचरा, नवी मुंबई महानगरपालिका.

 

५१ पैकी ४० रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासणी केली आहे. ३१ रुग्णालयांत यंत्रणा व्यवस्थित आहे. उर्वरित रुग्णालयांत काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्या दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -शिरीष आरदवाड, विभागप्रमुख, अग्निशमन, नवी मुंबई महानगरपालिका