१८ वर्षांवरील लसीकरणात दुसऱ्या दिवशी रांगा; लस न मिळाल्याने नाराजी नवी मुंबई : नवी मुंबईत १८ वर्षांवरील सर्वाचे मंगळवारपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र पहिल्या दिवशी तांत्रिक समस्येमुळे लसीकरण होऊ शकले नाही. तर बुधवारी दुसऱ्या दिवशीही लस कमी उपलब्ध असल्याने गोंधळ उडाला. शहरातील चार रुग्णालये तसेच नागरी आरोग्यकेंद्रावर तरुणांनी लसीकरणासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र प्रत्येक केंद्रावर फक्त ६० मात्राच उपलब्ध झाल्याने त्यांना लसीकरणाअभावी परत जावे लागले. लस न मिळाल्याने त्यांनी तीव्र संतापही व्यक्त केला आहे. महापालिकेने मंगळवारपासून १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण करण्याचे जाहीर केले होते. मंगळवारी तांत्रिक अडचणींमुळे या वयोगटातील प्रत्यक्षात लसीकरण झालेच नाही. त्यामुळे पालिकेच्या लसीकरणाच्या नियोजनात विस्कळीतपणा असल्याचे समोर आले. बुधवारपासून हे लसीकरण सुरळीत सुरू होईल असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. पालिकेची चार रुग्णालये व २३ आरोग्य केंद्रांवर पालिकेने नियोजन केले होते. मात्र लसच उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे दिवसभर नागरी केंद्रांवर गोंधळ होता. बुधवारी पालिकेकडे असलेला लशींचा साठा संपला आहे. संध्याकाळपर्यंत लस उपलब्ध न झाल्याने कोव्हिशिल्ड लसीकरणाबाबत संदिग्धता आहे. बुधवारी १८ वर्षांवरील सर्वाचे लसीकरण सुरू करण्यात आले, परंतु पालिकेकडे प्रत्येक नागरी आरोग्यकेंद्रावर फक्त ६० लस कुप्या उपलब्ध होत्या. नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने थोडासा गोंधळ झाला. दिवसभरात १८ ते ४४ वयोगटातील ३४४९ जणांना लस देण्यात आली अशी माहिती लसीकरण प्रमुख डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली. मी सकाळी मुलाला घेऊन सकाळी ७ वाजता सीवूड्स येथील नागरी आरोग्यकेंद्रावर गेलो होतो. केंद्रावर १८ वर्षांवरील नागरिकांसाठी ६० जणांना लस दिली जाणार होती. मी रांगेत उभा राहिलो, तर फक्त ४० कूपन दिले आणि लस संपली असे सांगितले. त्यामुळे सकाळी ७ ते ११ वाजल्यापासून उभे राहून लस मिळालीच नाही. पालिकेने योग्य नियोजन करावे. या केंद्रावर मोठी गर्दी होती. लसही नाही आणि मुलाचे ऑनलाइन शिक्षणही घेता आले नाही. -चौधरी जी.व्ही, सीवूड्स, रहिवासी