19 November 2019

News Flash

डिजिटल शिक्षणात गोंधळ

२० ते २२ ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

तांत्रिक अडथळे; जुनाच अभ्यासक्रम, परिपूर्ण विषयांची कमतरता

पूनम धनावडे, नवी मुंबई

खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांत आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून पालिकेने ‘डिजिटल प्राणाली’ उपलब्ध करून दिली आहे, मात्र यात अनेक अडचणी येत असून गोंधळ उडाला आहे. अनेक तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने शिक्षकही गोंधळून गेले आहेत.

जानेवारी २०१८ पासून पालिका शाळेत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ५३ प्राथमिक व १८ माध्यमिक आणि सीबीएससी शाळेत एकूण ५६० वर्गखोल्यांमध्ये डिजिटल फलक बसविण्यात आले आहेत. याकरिता ४ कोटी ४८ लाख ९२ हजार १७४ रुपये खर्च करण्यात आला आहे. या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल धडे शिक्षकांना शिकविण्यास आणि विद्यार्थ्यांना अवगत करून घेण्यास सोयीस्कर ठरत होते. मात्र नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून यात गोंधळ उडालेला आहे.

या प्रणालीत अद्याप जुनाच अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने शिक्षकांना याचा उपयोग होत नाही. २० ते २२ ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यामध्ये काही ठिकाणी गळती असल्याने समस्या येत आहेत तर काही ठिकाणी उपकरणे लावण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रणाली बसविण्यात आलेली नाही. शिक्षकांना पाठय़पुस्तकातील धडे शिकविताना या प्रणालीत नवनीत प्रकाशनची डिजिटल जोड असलेल्या व्हिडीयो, ऑडियो चित्रफिती दाखवून अधिक उत्तम प्रकारे संदर्भ देत विद्यर्थ्यांना शिकण्यास मदत होत होती. यामुळे विद्यार्थ्यांना चित्र स्वरूपात माहिती तसेच स्वाध्याय उपलब्ध होत असल्याने अधिकपणे ज्ञान अवगत होत होते, मात्र अनेक तांत्रिक त्रुटी येत असल्याचे शिक्षक सांगत आहेत.

शिक्षण विभागाचा अतिरिक्त भार दिलेल्या अधिकारी नितीन काळे यांनी सांगितले की, या वर्षी इयत्ता पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. आयुक्तांनी या प्रणालीत नवीन अभ्यासक्रम ८ दिवसांत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित संस्थेला केल्या आहेत. लवकरच नवीन अभ्यासक्रम उपलब्ध होईल.

फलकावर चित्र अस्पष्ट

* या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिली, आठवी व दहावी यांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. मात्र या प्रणालीत अद्याप जुनाच अभ्यासक्रम आहे. प्रणालीत सर्व विषयांची माहिती उपलब्ध नाही.

*  अनेक फलकांचे टच बोर्ड खराब आहेत. फलक लटकलेले असल्याने चित्रफीत पाहताना समस्या निर्माण होत आहेत.

*  संगकाचा वेग कमी आहे. तसेच चित्र हे ठळक दिसत नाही. त्याकरिता वर्ग खोल्यांमध्ये अधिक अंधार करण्याची गरज निर्माण होते. यासाठी लागणारे काळे पडदे उपलब्ध नाहीत.

संबंधित विभागाला आठ दिवसात नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यासाठी सूचित केले आहे. संगणकाची अडचण असल्यास अभियंता विभाग ती समस्या सोडवेल.

-डॉ.रामास्वामी एन, आयुक्त, मनपा

First Published on July 16, 2019 2:51 am

Web Title: confusion in digital education digital education problem zws 70
Just Now!
X