ऐरोलीत दुकानदारांनी ‘नो पार्किंग’ फलक हटवल्याने गोंधळात भर
ऐरोलीत सम-विषम पार्किंग वा ‘नो पार्किंग’चे फलक पाहून वाहने उभी केली जात होती. याचा परिणाम दुकानदारांच्या धंद्यावर होत असल्यावरून दुकानदारांनी ‘नो पार्किंग’चे फलकच काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
ऐरोलीत जोवर वाहतूक पोलीस कारवाई करीत नव्हते. तोवर ही बनवेगिरी खपून जात होती; परंतु अलीकडे मनाईक्षेत्रात चालक उभी करीत असलेली वाहने तत्काळ ‘टो’ केली जात आहेत. त्यामुळे खरेदीसाठी दुकानात शिरलेल्या गिऱ्हाईकाला बाहेर पडल्यानंतर वाहन जागेवर नसल्याचे कळल्यानंतर धक्का बसत होता. त्यामुळे अनेकांनी वाहनांसाठी ‘सुरक्षित’ जागा शोधण्यास सुरुवात केली. सध्या दुकानांपासून बऱ्याच लांब अंतरावर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे चालकांना पायपीट करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांकडून दुचाकीवरील कारवाईनंतर दिवागाव येथे उचलून नेण्यात येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पायपीट करत दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता कापत जावे लागत आहे.
ऐरोली परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत, त्यामुळे ऐरोलीतील अंतर्गत रस्त्यांवर सध्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ऐरोलीत पालिकेने सम-विषम गाडय़ा उभ्या करण्यासाठीचे फलक, तर काही ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक बसवले आहेत; परंतु हे फलकच सध्या त्या जागेवरून गायब झाले आहेत. त्यामुळे पार्किंगला मनाई असलेल्या क्षेत्रात केवळ फलक नाहीत म्हणून चालक वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
दुकानांसमोरील जागेत ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले आहेत. ते दुकानदारांनीच हटविल्याचा आरोप करण्यात येत आहे. बाहेरून आलेली वाहने येथे उभी केली जात आहेत. चालकांना ‘नो पार्किंग’चा फलकच दिसत नसल्याने वाहने बिनधास्तपणे उभी केली जात आहेत, तर वाहतूक पोलिसांकडून ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी केल्याने वाहतूक पोलीस ती उचलून नेत आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिकेने फलक लावण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी सम-विषम पार्किंगचे फलक ऐरोलीत लावण्यात आले आहेत; परंतु दुतर्फा लावलेली वाहने उचलण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे ‘टोइंग व्हॅन’ नसल्याने ‘नो पार्किंग’ क्षेत्रातील वाहनांवर कारवाई केली जात नव्हती.

ऐरोलीमधील सम-विषम पर्किंगचे बोर्ड काही ठिकाणी दुकानदारांनी तोडले आहेत, यासंदर्भात पालिकेला यांची माहिती देण्यात आली असून नवीन फलक बसवण्याचे सूचित केले आहे. वाहतूक पोलीस आजवर नियमानुसारच कारवाई करीत आहेत.
– एस. बी. जाधव, वाहतूक पोलीस निरीक्षक रबाळे

काही गृहसंस्थांमधील वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने काही रहिवासी रस्त्यावर उभी केलेली ‘बाहेरील वाहने’ तातडीने हटविण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधत असल्याचे बोलले जात आहेत. एका वाहनचालकाने तर गृहसंस्थांमधील रहिवाशांना रस्त्यांवर वाहने उभी करायची असल्याने त्यांना ‘बाहेरच्या वाहनांची’ अ‍ॅलर्जी असावी, असा आरोप केला.