शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडय़ा नेत्यांचा आशीर्वाद

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तब्बल १०५ नगरसेवकांनी मतदानाचा कौल दिला असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुंढे हटवा मोहिमेचे खरे सूत्रधार महापालिकेतील मातब्बर नगरसेवकांचे ‘सप्तक’ असल्याची जाहीर चर्चा मंगळवारी महापालिका वर्तुळात होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडय़ा नेत्यांच्या आशीर्वादाने रंगलेल्या या खेळाची सांगता सुफळ संपूर्ण व्हावी यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सभागृह नेते जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, राष्ट्रवादीचे अनंत सुतार, शिवसेनेचे नामदेव भगत, किशोर पाटकर या नगरसेवकांनी अखेपर्यंत मोर्चेबांधणी केल्याचे चित्र दिसून आले. सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्यापासून स्वपक्षातील मुंढे समर्थकांना चितपट करण्यासाठी या सप्तकाने केलेला आटापिटा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

नवी मुंबई महापालिकेत सत्ता कुणाचीही असली तरी येथील अर्थकारणावर या सात नगरसेवकांचा नेहमीच वरचष्मा दिसून आला आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांची महापालिकेत एकहाती सत्ता आणि वर्चस्व असतानाही येथील अर्थकारणावरील या दिग्गजांची पकड नेहमीच घट्ट होताना दिसली. ‘माझ्या राज्यात महापालिकेत सुपारीचा खांडही कुणाला खाऊ दिला जाणार नाही’ असे गणेश नाईक नेहमीच टेचात म्हणायचे. प्रत्यक्षात मात्र स्थायी समितीत टक्केवारीला याच काळात उधाण आल्याचे चित्र वारंवार दिसले. आर्थिक नियोजनाच्या नावाने सावळागोंधळ असताना हजारो कोटी रुपयांची कंत्राटे काढायची, पुढे याच कंत्राटांना मुदतवाढ द्यायची आणि मनात आले तर वाढीव रकमेलाही मंजुरी देऊन टक्केवारीचा दौलतजादा करायचा ही महापालिकेतील दैनंदिन कारभाराची जणू रितच होऊन बसली होती.

ठाणे-बेलापूर रस्ता, महापालिका मुख्यालय, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, स्काडा, मीटर जोडणी अशा अनेक मोठय़ा प्रकल्पांमधील कंत्राटांचे आकडे फुगविल्याचा संशय वेळोवेळी व्यक्त होत राहिला. नाईकांच्या राज्यात नवी मुंबईत पाच टक्क्यांना ऊत आल्याचा आरोप करणारा एक शिवसेना नेता अधिकारपदी असताना फुगविलेल्या ठेक्यांचा सूत्रधार होता, हे महापालिका वर्तुळात शेंबडय़ा पोरालाही ठावूक असल्यासारखी परिस्थिती होती.

या सगळ्या भोंगळ कारभाराला मुंढे आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर एकप्रकारचा वचक बसला होता. मुंढे यांच्या काळात नवी मुंबई महापालिकेतील एकही ठेका वाढीव दराने देता कामा नये असा फतवाच त्यांनी काढला होता.

याशिवाय कामे वेळेत पूर्ण करण्यात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना दंडाची आकारणी सुरू केली होती. मुंढे आहेत तोवर वाढीव रकमेचे प्रस्ताव आणताच येणार नाहीत याची पक्की जाणीव अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठांना होती. त्यामुळे ठेकेदार, अधिकारी, ठरावीक नगरसेवक, सुपारीबाज नेत्यांचेही धाबे दणाणले होते. त्यामुळे मुंढे हटाव मोहिमेत सहभागी झालेल्या सात दिग्गज नगरसेवकांच्या एकंदर भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सप्तकाचा आटापिटा

नवी मुंबईत सत्ताधारी राष्ट्रवादी काँगेस आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते एरवी एकमेकांची तोंडेही पाहात नसल्यासारखी परिस्थिती होती. शिवसेनेच्या एका नेत्याचा उल्लेख तर राष्ट्रवादीचे नेते ‘नायटा’ असाच करताना आढळतात. असे असताना मुंढेविरोधी भूमिकेत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत घडविण्यात या सात नगरसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजाविल्याचे चित्र आहे. पालकमंत्री एकनाथ िशदेंसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनपरिवर्तन घडविण्यात शिवसेनेतील दिग्गजांनी मोलाची भूमिका बजावली. विजय चौगुले, एम.के.मढवी यांच्यासारखे मोठे पदाधिकारी मुंढे यांचे समर्थन करत असताना त्यांना बाजूला सारून पालकमंत्र्यांवर भुरळ पाडण्यातही हेच दिग्गज आघाडीवर राहिले. एकंदरीतच १०५ नगरसेवकांना एका पंखाखाली आणताना सात नगरसेवकांनी बजावलेली भूमिका चर्चेचा विषय बनली आहे.

मुंढे यांच्याविरोधी ठरावाला सर्वच नगरसेवकांचे समर्थन होते. त्यामुळे केवळ सात नगरसेवकांच्या गटाने हे सगळे घडविले असे म्हणता येणार नाही. आपण ज्यांचा उल्लेख करता ते सर्व नगरसेवक आपआपल्या पक्षाचे निष्ठावंत आणि अभ्यासू म्हणून ओळखले जातात. जनतेसाठी लढताना त्यांनी पुढाकार घेतला याचा आम्हाला अभिमान आहे.

-विजय चौगुले, विरोधी पक्षनेते

आमचा राजकारण्यांवरच अविश्वास!

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यानंतर नवी मुंबईकरांच्या मनात राजकारण्यांबद्दल कमालीचा संताप व्यक्त करण्यात आला. भ्रष्टाचारमुक्त पालिका प्रशासनासाठी विडा उचललेल्या मुंढे यांच्यावर नागरिकांनी विश्वास कायम असल्याचे सांगितले. शहरातील संवेदनशील नागरिकांच्या या काही प्रतिक्रिया..

 

मुंढे यांच्याविरोधी ठरावाला सर्वच नगरसेवकांचे समर्थन होते. त्यामुळे केवळ सात नगरसेवकांच्या गटाने हे सगळे घडविले असे म्हणता येणार नाही. आपण ज्यांचा उल्लेख करता ते सर्व नगरसेवक आपआपल्या पक्षाचे निष्ठावंत आणि अभ्यासू म्हणून ओळखले जातात. जनतेसाठी लढताना त्यांनी पुढाकार घेतला याचा आम्हाला अभिमान आहे.

-विजय चौगुले, विरोधी पक्षनेते

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पारदर्शक कारभार आहे. ते स्वच्छ अधिकारी आहेत. त्यामुळे आयुक्तांवर अविश्वासचा ठराव आणून शहराचे मोठे नुकसान झाले आहे.

– कस्तुरी साळवी, नागरिक

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेत कामावर रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्यांना शिस्त लावली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामात पारदर्शकता आली. सामान्य माणूस आणि अधिकारी वर्ग यांच्यात एक समन्वय निर्माण झाला. आयुक्तांना भविष्यात काम करण्यासाठी संधी दिली पाहिजे.

– पूजा जाधव, नागरिक 

शहराचे विद्रूपीकरण करणारी बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना आयुक्तांनी चांगली चपराक दिली होती. मुंढे त्यासाठी योग्य आहेत.

– सचिन विनेरकर, विद्यार्थी

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कायद्याचे पालन करीत आहेत. नियमानुसारच महापालिकेचे प्रशासन चालवत आहेत; मात्र शहरातील मतलबी राजकारण्यांना ते नकोसे झाले आहेत. 

– स्नेहल रोडे, नागरिक

मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत आयुक्त व राजकीय नेत्यांमधील शीतयुद्ध वृत्तपत्रांतून वाचले आहे. एक सक्षम अधिकारी जर नवी मुंबई शहराला लाभला आहे, तर त्याचे राजकारण करून त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणणे चुकीचे आहे. अविश्वास खरे तर राजकीय नेत्यांवर आणला पाहिजे.

– सूरज भांडे, नागरिक

नवी मुंबईला विद्रूप बनवणाऱ्यांवर मुंढेंनी अंकुश ठेवला आहे. पालिकेचे अधिकारीही सामान्यांचे ऐकू लागले आहेत. आता नागरिकांना नगरसेवकांकडे खेटे घालावे लागत नाहीत. अविश्वासाचा ठराव चुकीचा आहे.

सागर कांबळे, नागरिक