X

Bharat Bandh : बंदला संमिश्र प्रतिसाद

वाहनचालकांची ‘इंधनकोंडी’; ठिकठिकाणी रास्ता रोको

वाहनचालकांची ‘इंधनकोंडी’; ठिकठिकाणी रास्ता रोको

सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह २१ पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नवी मुंबईत अल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतेक पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आल्याने वाहनचालकांची ‘इंधनकोंडी’ झाली. दुपारी चारनंतर पंप पूर्ववत सुरू करण्यात आले. बंदमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवली होती. बंदमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बंदमध्ये सामील झालेले पक्ष शहरातील सर्व मुख्य रस्त्यावरचे पेट्रोल पंप बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी धारकांनी पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची कल्पना नसल्याने सकाळी बाहेर पडलेल्या अनेकांना पेट्रोल मिळाले नाही. पेट्रोल पंप बंद असल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली. अनेकांनी दुपारनंतर पेट्रोल पंप सुरू होतील, या आशेवर पुढील प्रवास सुरू ठेवला. त्यामुळे अनेकांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडला. नवी मुंबईतील दिघा ते सीबीडी बेलापूरमधील अनेक बाजारपेठा नेहमीप्रमाणे सुरू होत्या. बंदमध्ये सामील पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वाशी येथील शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली होती. त्यामुळे परिसरातील बाजारपेठा दुपापर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एमजी कॉम्प्लेक्स ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, काँग्रेसने एपीएमसी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी पदयात्रा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र थेट विष्णुदास भावे येथे काँग्रेसच्या पदयात्रेची वाट पाहणे पसंत केले. कॉंग्रेसची पदयात्रा आल्यावर शिवाजी चौकात नेत्यांची भाषणे झाली. या भाषणांनाही फारशी गर्दी नव्हती. यात सर्व नगरसेवक सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याने आजची सर्वसाधारण सभाही रद्द करण्यात आली होती. जिथे थोडीफार गर्दी होती, तेथे बहुतांश लोकांनी सावलीचा आसरा घेतला होता. मात्र याच वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात आंदोलन केले. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यात चुली मांडून सरकारचा निषेध केला. घणसोली मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद केली, तर ठाणे-बेलापूर मार्गावर ‘रास्ता रोको’ केला. या वेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

बस, रेल्वेसेवा सुरळीत

विरोधकांनी पुकारलेल्या बंदचा शहरात मोठा परिणाम जाणवला नाही. सकाळपासून शहरातील शाळा सुरू असल्याने नेहमीप्रमाणेच पालकांची लगबग पाहायला मिळाली. तर काही खासगी शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाला सुट्टी दिली होती. एकीकडे शहरात बंदचे आवाहन करण्यात आले असताना रस्ते, रेल्वे वाहतूक सुरळीत होती. नेरुळ, सीवूड्स, सानपाडा, जुईनगर आणि वाशी भागांत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दुपारी तीननंतर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले. बंद काळात रिक्षा वाहतूकही सुरू होती. हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेसेवा सुरू होती. या वेळी कोणताही अनुचित घटना घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

First Published on: September 11, 2018 1:17 am