दोन आठवडय़ांवर येऊन ठेपलेल्या नवी मुंबई महापौर निवडणुकीत काँग्रेसच्या १० नगरसेवकांना महत्त्व आले असून त्यांच्यात उपमहापौरपदावरून दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या निवडणुकीबाबत सर्व आलबेल असल्याचे संकेत दिले जात आहेत. शिवसेनेचे महापौरपदाचे गणित जुळल्यास राष्ट्रवादी काँग्रसेने काँग्रेस या आपल्या मित्रपक्षाचा महापौर निवडणून आणण्याची खेळी देखील तयार ठेवली आहे.

काँग्रेसने राष्ट्रवादीला एकहाती पाठिंबा दिल्यास उपमहापौरपद व विशेष समित्यांचे सभापतीपद काँग्रेसला मिळणार आहे. उपमहापौरपदावर विद्यमान अध्यक्ष दशरथ भगत आणि माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी दावा केला आहे. म्हात्रे यांनी यापूर्वी उपमहापौरपद भूषविले असून ते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या खास मर्जीतील म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेतून अन्य पक्षांत गेलेल्या नगरसेवकांना स्वगृही आणण्यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे. त्यांना लक्ष्मीदर्शन घडवण्याची तयारीदेखील ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. अन्य पक्षाच्या उमेदवाराला मत दिल्यास किंवा गैरहजर राहिल्यास अपात्र ठरवण्याची भीतीदेखील दाखवली जात आहे. त्यामुळे कोपरखैरणे व घणसोलीतील दोन नगरसेवकांनी घेतलेला महाप्रसाद परत पाठवून दिला आहे. यात राष्ट्रवादीचे आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगण्यात येते.

ऐरोलीतील नगरसेविका हेमांगी सोनावणे या काँग्रेसमधील एकमेव ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांना यावेळी उपमहापौरपद देण्यात यावे, अशी काँग्रेसच्या काही नगरसेवकांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दहा नगरसेवकांमध्येही पदावरून एकवाक्यता नाही. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची चिन्हे आहेत.